मुंबई : चीनमधील ‘करोना’ व्हायरसमुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच इराण आणि अमेरिका यामधील लष्करी संघर्ष पुन्हा उफाळून आल्याने सोमवारी सकाळी शेअर बाजारात पडसाद उमटले. बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरु केल्याने मुंबई शेअर बाजारचा सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६० अंकांच्या घसरणीसह १२ हजार २०० अंकांच्या पातळीखाली आला आहे.

चीनमध्ये धुमाकूळ घालणारा जीवघेणा ‘करोना’ व्हायरस भारतात पोहोचला आहे. चीनमध्ये आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जगभर या विषाणूची भीती पसरली आहे. यामुळे चीनमध्ये दहशतीचे वातावरण आहे. चीनने लुनार नववर्ष सेलिब्रेशनवर करोनाचे सावट आहे. त्यातच इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे समोर आले आहे. इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे नाहीत. इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ पाच रॉकेट डागल्याचं वृत्त आहे. असं म्हटलं जातंय की हा हल्ला इराणने केला आहे. यामुळे मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

या सर्व घडामोडींमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सकाळपासून विक्रीचा सपाटा लावला. टायटन, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, नेस्ले, एचडीएफसी, पॉवरग्रीड, एलअँडटी, एसबीआय, कोटक बँक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर घसरले आहेत. मात्र आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इन्फोसिस या शेअरमध्ये तेजी आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमधील घसरण कायम आहे. मध्य पूर्वेतील अस्थिरतेने सोमवारी खनिज तेलाच्या किमतीत २ टक्क्यांची घसरण झाली. खनिज तेलाचा भाव ५९.५७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here