महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर २०२१ वर्षासाठीची ही यादी १५ डिसेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये ३७ दिवसांचा समावेश होता. या यादीतील व्यक्तींच्या जयंती, पुण्यातिथी निमित्त त्यांना अभिवादन करणे, इतर दिवस त्या सूचनाप्रमाणे साजरे करणे, अशा सूचना सर्व सरकारी कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. आता १४ जानेवारी २०२१ रोजी यासंबंधीची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये चार नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, १६ फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, १७ सप्टेंबरला केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि २७ डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम समाविष्ठ करण्यात आला आहे. बाकीचे दिवस पूर्वीच्या यादीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत.
मंत्रालय, सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांत या दिवशी संबंधित थोर व्यक्तींना अभिवादन करायचे आहे. त्यासाठी त्यांची प्रतिमा उपलब्ध करून सरकारी नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवसेनेकडून ठाकरे यांची जयंती यापूर्वीही साजरी करण्यात येत होती. त्यानिमित्त पक्षीय पातळीवर विविध उपक्रम घेतले जात होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर यावर्षापासून त्यांचे वडील आणि आजोबा यांचा समावेश सरकारी यादीत करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times