रेणु शर्मा या महिलेनं मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या रेणु शर्मानं केलेल्या आरोपांमुळं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. असं असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हे आरोप गंभीर असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनीही रेणु शर्माविरोधात मोठा खुलासा केल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळणं लागण्याची शक्यता आहे.
‘धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेनं माझा नंबर कुठूनतरी मिळवला आणि ती मला फॉलो करत होती. तिने माझ्याशी अनेकदा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मी अधिक चौकशी केली तेव्हा ती मोठ्या- मोठ्या लोकांना हेरायचा प्रयत्न करत असल्याचं मला कळालं होतं म्हणून मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. २०१८- १९ मध्ये ही महिला पैसे उकळण्यासाठी पुन्हा माझ्या संपर्कात आली. मीही यात अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता. मी देखील या महिलेविरोधात तक्रार दाखल करणार आहे,’ अशी माहिती धुरी यांनी दिली आहे.
कृष्णा हेगडेंचं पोलिसांना पत्र
‘रेणू शर्मा ही महिला २०१० पासून मला फोन आणि मेसेज करत होती. तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी माझ्या मागे लागली होती. माझा पाठलाग करण्यापर्यंत तिची मजल गेली होती. तब्बल पाच वर्षे ती मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या सूत्रांकडून तिच्याबद्दल माहिती काढली असता ती एक लबाड व्यक्ती असल्याचं मला समजलं. त्यानंतर मी तिला भेटण्याचं पूर्णपणे टाळलं. तिला तसं स्पष्ट बजावलंही होतं. दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर तिनं केलेल्या आरोपांनंतर मला धक्काच बसला. तेव्हाच मी तिच्याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times