मुंबईः महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना कालपासून राज्यभरात सुरू करण्यात आली आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. राज्य सरकारच्या या योजनेवर मनसेने टीका केली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवभोजन योजनेचे उद्धाटन करून जेवणाचा आनंद लुटला होता. याची माहिती आव्हाड यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली होती.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी या कार्यक्रमाचा फोटो ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. १० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ‘ अशा बोचऱ्या शब्दात अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. आव्हाडांचा फोटो शेअर करीत खोपकर म्हणाले की, तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, जितेंद्र आव्हाड हे शिवथाळी उद्धाटनावेळी जेवत असताना त्या टेबलवर बिसलेरी पाण्याची बॉटल ठेवण्यात आली आहे. याच मुद्द्यावर बोट ठेवून मनसेने आव्हाडांवर टीका केली आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून माहिती देताना म्हटले होते की, आज मनीषा नगर येथील नागरिकांसाठी “शिवभोजन” योजनेचे उदघाटन केले व मी स्वतः भोजनाचा स्वाद घेतला. गरीब व गरजू जनतेला फक्त दहा रुपयात दर्जेदार आहार भेटावं. हेच आमच्या महाविकास आघाडी सरकारचे उद्दिष्ट आहे. आव्हाडांच्या या ट्विटचा दाखला देत मनसेने त्यांच्यावर टीका केली आहे. आव्हाड यांच्या ट्विटमध्ये ते जेवत असून त्यांच्यासमोर बिसलेरी बॉटल दिसत आहे.

१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ‘ अशा शब्दात खोपकर यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

काय आहे शिवभोजन योजना?

गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावे यासाठी १० रुपयांत शिवभोजन योजनेची सुरुवात. २६ जानेवारीपासून ही योजना सुरु होणार आहे. या योजने अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक, ताजे भोजन मिळणार आहे.

कुठल्या भागात योजना राबवणार?

शिवभोजन योजनेअंतर्गत सुरुवातीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय परिसरात, जिल्हा रुगाणालय, बस स्थानक, रेल्वे परिसर, महानगरपालिका परिसरात एक भोजनालय सुरु करणार. गर्दीच्या आणि वर्दळीच्या भागात हे भोजनालय असणार आहे. या योजनेचा प्रारंभ काल प्रजासत्ताकदिनापासून सुरु करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी राज्यभरात या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here