गेल्या आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली होती. अमेरिकेतील हिंसाचार निवळला आहे. तर काही देशांमध्ये करोना लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक कमी केली. यामुळे दोन्ही धातूंचे भाव गडगडले होते. सध्या सराफा बाजारात सोने ४९००० ते ५०००० हजारांच्या दरम्यान आहे. त्यावर आयात शुल्क, घडणावळ आणि जीएसटी कर आकारला जातो.
आज सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४९०७७ रुपयांपर्यंत खाली आला होता. सध्या तो ४९१६० रुपये आहे. चांदीचा एक किलोचा भाव ६५९७८ रुपये झाला होता. सध्या तो ६६०९० रुपये असून त्यात ५९३ रुपयांची घसरण झाली आहे. good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४२० रुपये झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४२० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२७५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६५९० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०८७० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१११० रुपये आहे.
गुरुवारी जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा दर ०.७ टक्क्यांनी कमी झाला आणि १८४३.४० डॉलर प्रती औंसवर स्थिरावला. अतिरिक्त प्रोत्साहन मदत मिळवण्यावर बेट्स लागल्याने अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढले. त्यामुळे अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढले. तथापि, अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याची मागणी इतर चलनधारकांमध्ये वाढली.
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाकडून अमेरिकी अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्याकरिता महत्त्वपूर्ण मदतीची अपेक्षा केली जात आहे. याउलट, अतिरिक्त मदतीमुळे चलनवाढीचे संकट येऊन मौल्यवान धातूच्या किंमतीत घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. बहुतांश गुंतवणूकदार सोन्याकडे वळाले. चलन दरवाढ आणि महागाईच्या काळात सोने हेच प्रभावी ठरू शकते, असे मानले जाते. यासोबतच, बिकट जागतिक आर्थिक स्थिती आणि नव्या विषाणूच्या स्ट्रेनमुळे वाढलेली चिंता यामुळे सोन्याची मागणी वाढली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times