सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नश लाबुशेनने शतक झळकावले. पण यावेळी लाबुशेनला लवकर बाद करण्याची संधी अजिंक्यकडे चालून आली होती. पण अजिंक्यकडून यावेळी एक मोठी चुक घडली आणि याचा फटका भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी गोलंदाजी करत होता. त्यावेळी लाबुशेन हा ३७ धावांवर होता. त्यावेळी सैनीच्या गोलंदाजीवर फटका मारताना लाबुशेनचा अंदाच चुकला आणि अजिंक्यकडे एक सोपा झेल आला. पण अजिंक्यला यावेळी हा झेल टिपता आला नाही. त्यामुळे लाबुशेनला पहिले जीवदान मिळाले. त्यानंतर लाबुशेनने शतक झळकावत या जीवदानाचा चांगलाच फायदा उचलल्याचे पाहायला मिळाले.
लाबुशेनला यावेळी दोन जीवदानं मिळाली. अजिंक्यने पहिल्यांदा ३७ धावांवर असताना त्याला झेल सोडला. त्यानंतर लाबुशेन ४८ धावांवर असताना त्याचा झेल भारताच्या चेतेश्वर पुजाराने स्लीपमध्ये असताना सोडला. या दोन जीवदानानंतर लाबुशेनने चांगली फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. जर लाबुशेनला या दोनपैकी एकदा तरी भारतीय संघाने बाद केले असते तर ऑस्ट्रेलियाचा संघ पिछाडीवर ढकलला गेला असता, पण ते यावेळी पाहायला मिळाले नाही. त्याचबरोबर भारतीय संघाला पहिल्या दिवसावर आपचा वरचष्मा राखता आला नाही. त्यामुळे आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडतं, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
लाबुशेनने या सामन्यात १०८ धावा केल्या. टी. नटराजनने यावेळी लाबुशेनला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत लाबुशेनचे हे पाचवे शतक ठरले आहे. नटराजनने यावेळी लाबुशेनबरोबर मॅथ्यू वेडलाही बाद करत भारताला दुहेरी यश मिळवून दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पहिल्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times