वाचा:
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेले बलात्काराचे आरोप व त्यानंतर होत असलेल्या त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज माध्यमांसमोर भूमिका मांडली. ‘मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवरच काही लोकांनी आरोप केले आहेत. त्यात माजी आमदार व भाजपचे एक नेतेही आहेत. त्याशिवाय इतरही पक्षांतील लोक आहेत. एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा वेगळ्या पद्धतीनं विचार व्हायला हवा. काल मी जेव्हा भूमिका मांडली, तेव्हा पूर्ण चित्र माझ्यासमोर नव्हतं. केवळ महिलेनं मुंडेंवर केलेले आरोप इथपर्यंत ते प्रकरण मर्यादित होतं. त्यामुळंच ते गंभीर आहे असा शब्दा मी वापरला होता. आता नवनवीन माहिती पुढं आलीय. त्यामुळं पूर्ण चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणं हा एखाद्यावर अन्याय ठरू शकतो, असं सांगत, मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता पवारांनी फेटाळून लावली. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पथकामध्ये एसीपी स्तरावरील महिला पोलीस अधिकाऱ्याचा समावेश व्हावा, अशी सूचना आम्ही केल्याचंही ते म्हणाले.
वाचा:
मुंडे प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल विचारलं असता, ‘गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी खोलात जाण्याची गरज असते, असं सांगून, पवारांनी अधिक बोलणं टाळलं.
प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती?
‘मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नेमकी काय माहिती दिली आहे, याची मला माहिती नाही. त्या तांत्रिक बाबी आहेत. देशात यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं झालीत. अत्युच्च पातळीवरील लोकांकडूनही झाली आहेत. मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही,’ असं सूचक वक्तव्यही शरद पवार यांनी केलं.
सत्ता गेली की अस्वस्थता येतेच!
धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले आरोप, यांच्या जावयाची चौकशी, यांना समन्स या सगळ्यामागे राजकारण आहे का असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, ‘ज्याच्या हातातून सत्ता गेली आहे, त्यांची अस्वस्थता समजू शकतो. नाराजी असणारच. ज्यांनी सत्ता मिळू दिली नाही, त्यांना लक्ष्य केलं जाणं यात मला काही फार आश्चर्य वाटत नाही. हा राजकारणाचा भाग आहे.’
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times