करोना बळींची संख्या वाढत असल्याने गेल्या आठवड्यात सोने दरात १ टक्क्याची वाढ झाली होती. भांडवली बाजारात गुंतवणूकदार विक्री करून पैसे काढून घेत आहेत. करोनाचा धोका आणि अमेरिका-इराण संघर्ष यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळाले असल्याचे गुंतवणूक सल्लागारांचे मत आहे.
सोमवारी आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १५७९ डॉलरवर गेला. चांदीचा दर ०.९ टक्क्यानी वाढून १८.२४ डाॅलर प्रति औंस झाला आहे. यापूर्वी ७ वर्षांपूर्वी सोने दर १६१० डॉलर प्रति औंस होता. दिल्लीतील सराफ बाजारात सोने दर ४१ हजार ६०० रुपयांच्या आसपास आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव सध्या ४०५६४ रुपये आहे. दिवसभरात सोन्याने २६७ रुपयांची वाढ नोंदवत ४० हजार ६१९ रुपयांचा उचांक गाठला होता. जगभरातील घडामोडी पाहता जाणकारांकडून कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १५९२ ते १६१० डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात १८ पैशांचे अवमूल्यन झाले.
या कारणांमुळे सोने दरात तेजी
– ‘करोना व्हायरस’मुळे चीनमध्ये आतापर्यंत ८०हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास दोन हजार नागरिकांना ‘करोना’ची लागण झाली आहे.
– हा व्हायरस इतर देशांमध्ये पसरण्याची शक्यता असून त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत.
– ‘करोना’मुळे चिनी अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे. पर्यायाने आशियाई अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.
– इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे समोर आले आहे. इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ पाच रॉकेट डागण्यात आली. यामुळे मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे.
– आज चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात १८ पैशांचे अवमूल्यन झाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times