‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्याचा अर्ज देण्यासाठी किंवा लिखित उत्तरे घेण्यासाठी यापुढे महापालिकेच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे घालण्याची गरज नाही. पालिका लवकरच ही सेवा ऑनलाइन सुरू करणार आहे. त्यामुळे घरबसल्या ही माहिती मिळू शकणार आहे. ऑनलाइन माहितीमुळे लाखो मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

एखाद्या विषयासंबंधी माहिती मिळवण्यासाठी संबंधित सरकारी कार्यालयात लेखी अर्ज करावा लागतो. त्यावरील उत्तरवजा माहिती वैयक्तिक किंवा टपालाद्वारे संबंधित अर्जदाराला पाठवली जाते. नुसार संबंधित माहिती एक महिन्यात देण्याचा कायदा असला, तरी अनेकदा दिलेल्या मुदतीत माहिती मिळतेच असे नाही. काही वेळा माहिती मिळण्यात तांत्रिक अडथळे, तर काही वेळा माहिती दडवण्याचे प्रकार घडत असतात. यामध्ये अर्जदाराला सरकारी कार्यालयातील चकरा आणि नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

नागरिकांना जलद वेळेत माहिती मिळण्यासाठी ही यंत्रणा ऑनलाइन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते करत आहेत. राज्य सरकार वगळता अद्याप अन्य सरकारी यंत्रणेत ऑनलाइन माहिती देण्यात येत नाही. मुंबई महपालिका ऑनलाइन सेवा कधी सुरू करणार, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी माहिती मागितली होती. याबाबत पालिकेने दिलेल्या उत्तरात ‘ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची पूर्तता माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने पूर्ण केली असून, प्रमुख कर्मचारी अधिकारी विभागाने ही यंत्रणा कधी सुरू करायची याबाबत सूचित केलेले नाही,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिकेला तांत्रिक अडथळे
याबाबत पालिकेच्या कर्मचारी अधिकारी विभागाच्या प्रमुख संध्या व्हटकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काही तांत्रिक बाबींमुळे अद्याप ऑनलाइन सुरू करता आले नसल्याचे सांगितले. या यंत्रणेसाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर काही वाॅर्डात प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली जाईल. त्यानंतर मुंबईतील सर्वच वाॅर्डात ही सेवा सुरू करण्यात येईल. लवकरच ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे व्हटकर यांनी स्पष्ट केले.

पालिकेचा वेळकाढूपणा

माहितीचा अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी पालिकेचा हा दावा म्हणजे मूळ मुद्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. पालिकेकडे स्कॅनर, प्रशिक्षित मनुष्यबळ सर्व काही आहे. ऑनलाइनमुळे पालिका कर्मचाऱ्यांचे काम वाढणार असल्याने, होता होईल तेवढा वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. ऑनलाइन झाल्यास महिला आणि ज्येष्ठ नागरिक, तसेच दूरवरून येणाऱ्या नागरिकांचा त्रास कमी होणार आहे, असे यादव म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here