वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला आज, शनिवारपासून (१६ जानेवारी) सुरुवात होत आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात होत असून, करोनाविरोधी लढ्यात अग्रणी आणि महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या करोनायोद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल. करोनायोद्ध्यांपैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

देशातील एकूण ३,००६ लसीकरण केंद्रांपैकी ठरावीक केंद्रांतील लाभार्थ्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी या केंद्रावरील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

३,००६

देशभरातील लसीकरण केंद्रे

१००

दररोज एका केंद्रावर लस घेणारे नागरिक

१ कोटी ६५ लाख

‘कोव्हिशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’चे विविध राज्यांत पोहोचलेले डोस

तीन लाख

करोनायोद्ध्यांना आज मिळणार लस

२८५

राज्यातील लसीकरण केंद्रे

२८,५००

राज्यात आज लस मिळणारे लाभार्थी

लसीकरण दृष्टिक्षेपात

– आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडिओ लिंक’च्या माध्यमातून देशव्यापी लसीकरणाला सुरुवात

– लसीकरणासाठी आवश्यक ‘को-विन’ अॅपचेही मोदी करणार लोकार्पण

– १०७५ या क्रमांकावर २४*७ लसीकरणाबाबत माहिती मिळणार

– राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लस वितरणाची केंद्रे पाच हजारापर्यंत वाढवणार

वर्षाच्या आत लसीकरण सुरू

नवी दिल्ली : देशात करोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी २०२० रोजी सापडला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमाचा २० वर्षीय विद्यार्थी चीनमधील वुहान येथून केरळमधील त्रिसूर येथे परतला होता. हा देशातील पहिला करोनारुग्ण ठरला होता. महाराष्ट्रात पहिला करोनारुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुण्यात आढळला होता. करोनारुग्ण आढळल्यानंतर एक वर्षाच्या आतच देशात आज लसीकरण सुरू होत असून, देशाने दिलेला करोनाविरोधी लढा विविध देशांच्या तुलनेत उजवा ठरला असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या सू्त्रांचे म्हणणे आहे. आजपासून सुरू होणारी लसमोहीम ही जगात सर्वांत मोठी मोहीम असेल, असेही सांगण्यात आले.

‘करोनाच्या शेवटाची सुरुवात’

नवी दिल्ली : ‘करोना लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा शनिवारपासून सुरू होत असून, ही करोनाच्या शेवटाची सुरुवात आहे,’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लसीकरणाच्या पूर्वसंध्येला दिली. करोनाविरोधी लढाई आपण एकजुटीने लढली असून, लसीकरणाची मोहीमही आपल्याला एकमेकांच्या साथीने पूर्ण करायची आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशात करोनाचे १५,५९० नवे रुग्ण आढळले असून, देशातील एकूण करोनारुग्णांची संख्या १,०५,२७,६८३ झाली आहे. देशात करोनामुळे गेल्या २४ तासांत १९१ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्युमुखींची संख्या १,५१,९१८ झाली आहे.

पुण्यात तयारी पूर्ण

पुणे : ‘पुणे महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात आज, शनिवारी (१६ जानेवारी) सकाळी अकरा वाजता मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. शहरातील एकूण आठ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे,’ अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली. ‘नोंदणी नसलेल्या लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये,’ असे आवाहनही त्यांनी केले.

बीकेसीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मुंबई : कोविडप्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज, शनिवारी सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे. तत्पूर्वी, देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ सकाळी १०.३० वाजता विलेपार्ले स्थित डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईत सुरुवातीला दररोज सरासरी ४ हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर ठाणे जिल्ह्यात पहिल्या दिवशी २,३०० लाभार्थींचे लसीकरण होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here