औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा समोर आला होता. मात्र, या मुद्द्यांवर सरकारमध्येच दोन गट पडले आहेत. शिवसेना नामांतराच्या मुद्द्यावर ठाम आहे तर काँग्रेसनं मात्र विरोध केला आहे. या मुद्द्यावर भाजपनं सरकारवर जोरदार टीकाही केली होती. त्यामुळं नामांतराचा हा वाद अधिकच पेटला आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी मागणी करत भाजप युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी लव औरंगाबाद असे फलक लावण्यात आलेल्या भागात नमस्ते संभाजीनगर असे फलक लावले.
शहरात महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्तानं शिवसेना कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी केली आहे. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनीही ही वेळ साधत शिवसेनेला मात देण्यासाठी शहरात नमस्ते संभाजीनगरची पोस्टर झळकावले आहेत.
स्वागत फलकांवरून दोन्ही काँग्रेस गायब
राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी शिवसेनेचे नेते, राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शनिवारी येत आहेत. त्यांच्या हस्ते चार प्रमुख प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहराच्या विविध भागात फलक लावले आहेत. प्रामुख्याने ते ज्या ठिकाणी लोकार्पणासाठी जाणार आहेत त्या ठिकाणी आणि तेथील चौकात त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांवर फलक लावले आहेत. या फलकांवर केवळ शिवसेना नेते आणि पदाधिकारी, आमदारांचाच उल्लेख आणि फोटो आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी, नेत्यांचा त्यात उल्लेख नाही. या दोन्ही काँग्रेसला स्वागत फलकांवरून हद्दपार केले आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी हे फलक लावले आहेत. लोकार्पणाचे शहरातील कार्यक्रम होत आहेत शिवसेनेचेच आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. यामुळे औरंगाबाद शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आहे की नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times