नागपूरः संपूर्ण देश ज्या लशीची आतुरतेने वाट पहात होता, त्या कोव्हिड लसिकरण राष्ट्रीय अभियानाला देशभरात शनिवारपासून सुरवात झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर एकाच वेळी सुरू झालेल्या या लसीकरणात २७९ केंद्रांवर ऑक्सफर्ड आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या कोव्हिशिल्डचे तर सहा केंद्रांवर हैदराबाद येथील भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस करोना संक्रमण काळात फ्रंटवर लढलेल्या कोव्हिड वॉरियर्सना देण्यात आला.

मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ४९, मेयोतील वॉर्ड क्रमांक ४० आणि डागातील जुनी बालरोग बाह्यरुग्ण विभागातील वॉर्डक्रमांक १५ येथे हे कोव्हिड लसिकरण अभियान राबविण्यात आले. राज्यातील ज्या सहा केंद्रांवर या कोव्हॅक्सिन लशीचा डोस देण्यात आला, त्यापैकी एक लसिकरण साईट उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होती. संपूर्ण देशी बनावटीच्या या लसीवरून मधल्या काळात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे ही लस घेण्यासाठी काही डॉक्टरांनी नाराजी व्यक्त करीत लस टोचून घेण्यास विरोध केला. त्यामुळे को विन अॅपवर नाव नोंदणी करूनही कोव्हिशिल्ड ऐवजी एनवेळी कोव्हॅक्सिन लशीचा डोस पुरविला गेल्याने या डॉक्टरांनी लसीकरणातून काढता पाय घेतला.

कोव्हॅक्सिनची लस अद्याप क्लिनिकल ट्रायलची शेवटची फेरी पूर्ण करून पुढे जाऊ शकलेली नाही. त्यामुळे हा लशीचा प्रयोग करण्यासाठी डॉक्टरांचा गिनपिग म्हणून वापर केला जात असल्याची नाराजीही मेडिकलमधील लसीकरण केंद्रावर ऐकायला मिळाली.

डॉ. रिना कौर रुपारॉय, डॉ. भालचंद्र मुरार कोव्हॅक्सिनचे पहिले दोन लाभार्थी

मात्र त्यावर मात करीत मेडिकलमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. रिनाकौर रुपारॉय आणि डॉ. भालचंद्र मुरार हे कोव्हॅक्सिनची लस टोचून घेण्यास स्वत:हून पुढे आले. मेयोतील केंद्रावर अधिष्ठाता डॉ. अजय केओलिया तर डागाच्या केंद्रावर डॉ. संध्या डांगे हे कोव्हिशिल्डचे पहिले लाभार्थी ठरले.

मेडिकलमध्ये सुरक्षित वावरचा फज्जा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ४९ मध्ये कोव्हिड लसीकरणाचे केंद्र सुरू करण्यात आले होते. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून को विन अॅपवर नोंदणी केलेल्या लाभार्थींनाच आत सोडले जाणे अपेक्षित होते. मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात झाली, त्यावेळी सगळा लोंढा लसिकरणासाठी केंद्रात पोचला. लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्याने सुरक्षित वावरचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र होते.

फाटक्या आणि मळकट चादरी

मेडिकलच्या कोव्हिड लसीकरण केंद्रावर लस टोचली गेल्यानंतर कोणाला रिअॅक्शन आल्यास त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी निरीक्षण वॉर्ड तयार करण्यात आला. मात्र या निरीक्षण वॉर्डमधील गाद्यांवर अंथरलेल्या चादरी फाटक्या आणि जागोजागी डागाळलेल्या होत्या.

डागात टोकन, स्लॉट प्रणाली

प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित डागा स्मृती स्त्री रुग्णालयात ड्राय रन घेतला गेला होता. त्यावेळी डागा नियोजनात सपशेल फेल झाल्याचे निदर्शनास आले होते. या त्रूंटीमध्ये सुधारणा करीत डागा रुग्णालयाने प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी चोख नियोजन केल्याचे दिसून आले. लसीकरणाच्या वेळी गर्दीमुळे गोंधळ उडू नये यासाठी डागा रुग्णालयात टोकन सिस्टिम लावण्यात आली. यादीनुसार कोव्हिशिल्ड लशीसाठी लाभार्थी कोव्हिड वॉरियर केंद्रावर येताच, त्याचे नाव यादीत तपासून त्याच्या हाती टोकन देण्यात आले. या टोकन क्रमांकानुसारच एकेकाला लसीकरणासाठी आत पाठविले गेले. दुपारच्या वेळी अपेक्षित गर्दी लक्षात घेता रुग्णालयाने आणखी एक फेरबदल करीत २५-२५ जणांचा स्लॉट तयार करीत त्यांना जो वेळ देण्यात आला त्याच वेळी लसीकरणासाठी येण्यास सांगण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here