लॉकडाउनच्या संकटानंतर नाटक सुरू होऊन आता एक महिना झाला आहे. नेमकं काय चित्र आहे रंगभूमीवर?
कलाकारांचा, प्रेक्षकांचा उत्साह खूपच छान आहे. पण, निर्मात्यांच्या बाजूने विचार करता आर्थिक गणित जमणं गरजेचं आहे. ५० टक्के प्रेक्षकक्षमतेसह परवानगी असल्याने या बुकिंगमध्ये फार घट होऊन चालणार नाही. किमान ३० ते ३५ टक्के बुकिंग तरी व्हायला पाहिजे. त्यापेक्षा कमी बुकिंग झालं, तर त्यातही प्रयोग करण्याची तयारी हवी. म्हणूनच लॉकडाउनपूर्वी जी नाटकं जोरात चालली होती, तीच नाटकं आता रंगभूमीवर आहेत. आज नाटकांना बऱ्यापैकी बुकिंग मिळतंय. कलाकार, रंगमंच कामगार पूर्णपणे खबरदारी घेऊन काम करतात. प्रेक्षकही मास्क घालून असतात. त्यामुळे काळजी घेऊनच काम सुरू आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत प्रत्येक महिन्यामध्ये मी नाटकाचा दौरा आखतो आहे. शेवटी तिथं प्रत्यक्ष गेल्याशिवाय कळणार नाही.
५० टक्के प्रेक्षकक्षमतेसह आणखी किती काळ नाटक सुरू ठेवता येईल?
तुमच्यात टिकून राहण्याची क्षमता किती आहे? तुमची इच्छाशक्ती किती आहे? यावर सारं काही अवलंबून आहे. एक-दोन प्रयोगांमध्ये तोटा झाला, तरी नाटक पुढे चालवता आलं पाहिजे. म्हणूनच नाटकाच्या टीमचा अभ्यास पक्का असायला हवा. कुठल्या दिवशी, कुठल्या थिएटरला नाटक चालू शकतं याचा नेमका अंदाज घेता आला पाहिजे. प्रत्येक निर्मात्यानं हा अभ्यास करणं गरजेचं आहे.
अंदाज घेताना ५० टक्क्यांमध्येही साधारण ३० टक्केच बुकिंग होणार आहे हे गृहित धरुन त्यानुसार नियोजन करायला हवं. हळूहळू प्रत्येकानं हे करून बघावं. मी कल्याण, डोंबिवली, मुंबईत प्रयोग करून पाहिले. आता नगरला प्रयोग आहे. ११ महिन्यांनंतर आता नाशिकला १७ तारखेला प्रयोग होणार आहे. सगळीकडे प्रयोग करून पाहणं गरजेचं आहे. पण, ज्या नाटकांना आधीही बुकिंग होतं, अशीच नाटकं १०० टक्के चालू शकतील अशी परिस्थिती सध्या दिसतेय.
आणखी किती नाटकं रंगभूमीवर येण्याची शक्यता आहे? नव्या नाटकांचं काय?
काही नवीन नाटकांवर सध्या काम सुरू आहे. पण, ती येणार कधी हा प्रश्न आहे. १०० टक्के प्रेक्षकक्षमतेसह प्रयोग करण्याचा निर्णय होत नाही, तोवर ते होणं कठीण दिसतं. किती लांब उडी मारायची हा विचार त्या-त्या निर्मात्यानं केला पाहिजे. सर्वांच्या सहकार्यातून सध्या प्रयोग सुरू असले, तरी या मदतीवर किती काळ चालेल हा प्रश्नच आहे. सध्याची परिस्थिती पाहता येत्या पावसाळ्यानंतर खऱ्या अर्थानं नवीन नाटकांचा मोसम येऊ शकेल असं वाटतं. कुठल्याही नव्या नाटकामध्ये किमान २० लाखांची गुंतवणूक असते. नफ्याचं गणित सध्या कमी राहणार हे लक्षात घेऊन, सूक्ष्मपणे नियोजन करून काम करावं लागेल.
रंगमंच कामगारांना मदत देणं अद्याप सुरू आहे का?
डिसेंबरपर्यंत मदतीची प्रक्रिया सुरू होती. पण, आता हळूहळू प्रयोग सुरू झाले आहेत. मदत किती काळ, किती जणांना करणार हा मुद्दा होताच. पण, घाबरुन जाऊन चालणार नाही. सर्वांना काळजी घेऊन काम करायचं आहे. प्रत्येकानं मानसिकदृष्ट्या खंबीर राहणं आवश्यक आहे.
लसीकरणाला सुरुवात होत असताना आता प्रेक्षकांच्या मनातील भीती हळूहळू कमी होताना दिसतेय का?
नाट्यगृहात येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचं तापमान तपासणं, सॅनिटायझेशन या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे एकदा तुम्ही नाट्यगृहात स्थानापन्न झालात, की तुमच्या आजुबाजूचा माणूस निरोगी आहे याची शाश्वती आहे. नाट्यगृहात आल्यावर प्रेक्षक अतिशय मनमोकळेपणानं नाटकाचा आनंद घेतात. त्यांच्यात सकारात्मकता दिसून येते. कलाकारांविषयी रसिक प्रेक्षकांना वाटणारी विश्वासार्हता हीदेखील महत्त्वाची आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times