‘एक शहर, एक लस’ असे सूत्र प्रत्यक्ष लसीकरणापूर्वी सांगितले जात होते. मात्र, ऐन लसीकरणाच्या एक दिवस आधी जेजे रुग्णालयामध्ये भारत बायोटेकची देण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले. पालिका क्षेत्रामध्ये कोव्हिशील्ड दिली जात असताना, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिनचा आग्रह का आहे, असा प्रश्न लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शनिवारी जेजे रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीयतज्ज्ञांनी उपस्थित केला.
रुग्णालयातील ३९ जणांनी ही लस घेतली असली, तरी ती घेण्यापूर्वी काही जणांच्या मनामध्ये संभ्रम होता, अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष केंद्रापर्यंत जाऊन संमतीपत्र भरण्यापूर्वी निर्णय बदलून थांबा आणि पाहाचा पवित्रा घेतला. चाचण्या पूर्ण होऊन अंतिम निष्कर्ष आलेले नाहीत, अशी लस घेण्याचा आग्रह का करण्यात आला, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर आपल्याला कोव्हिशील्ड लस घ्यायची होती. लस घेतली नाही, तर इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन कसे मिळणार, अशीही प्रतिक्रिया नोंदवली.
रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आज पहिला दिवस असल्याने प्रतिसाद थोडा कमी होता. लसीकरणासंदर्भात माहितीही उशिरा प्राप्त झाली. तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. सोमवारपासून प्रतिसाद वाढेल, असे सांगितले.
पालिकेच्या वॉर रूममधून लसीकरणासाठी संबधित रुग्णालयासह कामाच्या जवळच्या ठिकाणी राहणाऱ्या आरोग्यकर्मचाऱ्यांना संपर्क साधण्यात आला होता. जेजेमध्ये मात्र रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली.
याला चाचणी मानायचे का?
जेजे रुग्णालयामध्ये भारत बायोटेकच्या या लशीच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यात कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आढळून न आल्यामुळे ही लस घेताना दिलासा होता, असे लस घेतलेल्या डॉक्टरांनी सांगितले. मात्र, दुसरीकडे संमतीपत्र भरून देण्यापूर्वी आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीमध्ये ही लस देण्यात यावी, असे सूचित करण्यात आले आहे, त्याचाच दुसरा अर्थ हे लसीकरण चाचणीचा भाग मानायचे का व लाभार्थ्यांचा समावेश हा यापूर्वी झालेल्या ४३६ जणांमध्ये करायचा का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. ही लस घेतल्यानंतर आता दुसरी लस घेता येणार नाही. त्यामुळे २८ दिवसांनी पुन्हा या लशीचा दुसरा डोस या डॉक्टरांना घ्यावा लागणार आहे. चाचण्यांमधील निष्कर्षांची निश्चिती झाल्यानंतर हे लसीकरण करणे योग्य होते, असाही सूर व्यक्त होत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times