चित्रपटाच्या पूर्वार्धात नायक विजय आणि खलनायक विजय सेतूपती यांच्या स्वतंत्र कथा सांगितल्या आहेत. त्या समांतर सुरू असतात. यामुळे चित्रपट परिपूर्ण होण्यास मदत होते. नायक आणि खलनायकाला प्रेक्षकांच्या नजरेत प्रस्थापित केल्यांनतर मध्यंतराच्या आधी चित्रपटाच्या मुख्य कथानकाला सुरुवात होते. मग मनोरंजनाचा ‘साऊथ डोस’ सुरू होतो. भवानी नावाच्या किशोरवयीन मुलाच्या कुटुंबाला गुंड ठार मारतात. भवानीला बनावट खटल्यांमध्ये अडकवून त्याला सुधारगृहात पाठवलं जातं. तिथं त्याला वाईट वागणूक मिळते. या अनुभवांमुळे तो नीडर आणि शक्तिशाली होत असतो. एक दिवस तो सुधारगृहातून पळ काढतो. कालांतरानं भवानी (विजय सेतूपती) त्याच सुधारगृहाला त्याचा बालेकिल्ला बनवतो. पुढे तो चुकीच्या मार्गानं विविध व्यवसाय करतो. त्याला राजकारणात उतरण्याची इच्छा असते. त्याच्या मार्गात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो ठार मारत असतो. त्या खुनांचे आरोप तो सुधारगृहातल्या मुलांवर टाकतो आणि स्वत:चा बचाव करतो. हा सिलसिला सुरूच असतो.
दुसरीकडे चेन्नईतल्या एका कॉलेजमध्ये जेडी (विजय) नावाचा एक प्रोफेसर असतो. तो मद्याच्या आहारी गेलेला असतो; पण विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणारा आणि त्यांना सरळ मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा असतो. त्यामुळे तो सर्व विद्यार्थ्यांचा लाडका असतो. पुढे कथानक रंजक वळणं घेतं. जेडीला तीन महिन्यांसाठी सुधारगृहात मास्टर म्हणून पाठवलं जातं. सुधारगृहातल्या दोन मुलांच्या मृत्यूनं जेडी रागानं पेटतो. त्याला भवानी नामक व्यक्तीला ठार मारून मुलांच्या हत्येचा बदला घ्यायचा असतो. हे करण्यात तो यशस्वी ठरतो का? या प्रश्नाचं उत्तर चित्रपट पाहिल्यावर मिळेल. भवानीची भूमिका विजय सेतूपतीनं उत्तम साकारली आहे. दुसरीकडे थलपति विजय संपूर्ण सिनेमात राजासारखा वावरला आहे. तो मिश्किल आहे, विनोदबुद्धी असलेला आहे, प्रेमळ आहे आणि प्रसंगी कठोर वागणाराही आहे. एकदंर दोघांनी चित्रपटात धुमाकूळ घातला आहे. तांत्रिक बाजू आणि संगीत याबाबतीतही चित्रपट उजवा आहे. पटकथेची योग्य बांधणी, दिग्दर्शकाची सिनेमावर अचूक पकड आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट मस्ट वॉच ठरतो.
मास्टर
निर्मिती ः झेवियर ब्रिटो
कथा/दिग्दर्शन ः लोकेश कनगराज
पटकथा ः लोकेश कनगराज, रतनकुमार, पोन पार्थीबन
कलाकार ः विजय आणि विजय सेतूपती
संगीत ः अनिरुद्ध रविचंदर
छायांकन ः सथ्यान सूर्यन
संकलन ः फिलोमीन राज
दर्जा ः चार स्टार
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times