तांडव वेबसिरीजची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत एका दृश्यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळं हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच, निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे. यानंतर भाजपनंही या वेबसिरीजचा तीव्र विरोध केला असून राम कदम यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात तांडव वेबसिरीजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यात हिंदू देवतांचा अपमान करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं असून या वेबसिरीजचा निर्माता, दिग्दर्शक आणि यात काम करणाऱ्या कलाकारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.
दरम्यान, राम कदम यांनी एक ट्विटही केलं आहे. त्यात त्यांनी अभिनेता सैफ अलीखानवर देखील निशाणा साधला आहे. चित्रपट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून कायमच हिंदू देवी देवतांचा अपमान केला जातो. अलिकडेचं उदाहरण घ्यायचं झालं तर नवीन वेबसिरीज तांडव. सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच चित्रपट, सिरीजचा भाग झाला आहे, ज्यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ते दृश्य हटवले पाहिजे, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times