करोनाची दहशत अजून पुरती सरलेली नसतानाच आता बर्ड फ्लूचे आगमन होत आहे. विदर्भात काही ठिकाणी मोर, कोंबड्या, कावळे असे पक्षी मोठ्या प्रमाणात मृत पावले आहेत. यवतमाळ व गडचिरोली येथे तर पक्ष्यांना फ्लूची लागण झाल्याचे अहवाल प्रयोगशाळेतून आले आहेत. या बातम्यांचा परिणाम शहरातील सावजी भोजनालयांमध्ये तसेच विविध विविध हॉटेल्समधील चिकन करीच्या व्यवसायावर झाला आहे.
नागपूर शहर सावजी भोजनालयासाठी प्रसिद्ध आहे. या भोजनालयांमध्ये ब्रॉयरलसहच गावराणी आणि कातीचा कोंबडाही मिळतो. गावराणी, कातीचा कोंबडा यांच्या चिकनचे दरही जास्त असतात. मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने सावजी भोजनालयांकडे पाठ फिरविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जुनी मंगळवारी येथील प्रभू सावजी भोजनालयाचे प्रभू कुंभारे म्हणाले की, आमच्याकडे फक्त गावराणी कोंबडीचे चिकन मिळते. बर्ड फ्लूची लागण ब्रॉयलर कोबंड्यांना होण्याची भीती असते. त्यामुळे काही ग्राहक येतात, पण मागणी अगदीच कमी आहे. इतरवेळी दररोज १० ते १२ किलो चिकन भोजनालयात लागायचे मात्र आता आता दिवसभरात २ किलोही चिकन संपत नाही, अशी स्थिती आहे. चिकनची मागणी कमी झाल्याने मटनची मागणी वाढेल असे वाटले होते पण बऱ्याच ग्राहकांनी सध्या मांसाहारच वर्ज्य केला आहे. त्यामुळे सध्या ‘श्रावण’ महिन्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहर करीत नाहीत. त्यामुळे ग्राहकी कमी असते, सध्या तोच अनुभव येत आहे.
चिकनसहच अंड्यांनाही मागणी उरलेली नाही. वास्तविक चिकन ज्या तापमानावर शिजविले जाते, त्या तापमानावर कोणताही विषाणू जिवंत राहू शकत नाही. मात्र लोकांमध्ये भीती असल्याने लोक सावजी भोजनालयांमध्ये यायला तयार नाही व आमचा व्यवसाय ५० टक्क्यांवर आला असल्याचे कुंभारे यांनी सांगितले.
बेसा येथील पवनीकर सावजी भोजनालयाचे अजय पवनीकर म्हणाले की, लोकांमध्ये असलेली फ्लूची भीती पाहता आम्ही चिकन ठेवणेच बंद केले आहे. कारण आणलेला माल तसाच पडून राहतो. मात्र अंडाकरी विकणे सुरू आहे. नेहमी चिकन खाणाऱ्यांना चिकनच पाहिजे असते. मटनाला त्यांची फार पसंती नसते. त्यामुळे धंद्यावर निश्चित परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व परिस्थीतमुळे सावजी भोजनालये, रस्त्यावरील चिकन बिर्याणीची दुकाने यांच्या व्यवसायातून कोंबडी पळाल्याचा अनुभव शहरात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times