म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर: देशातील विरोधी पक्ष कमकुवत आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे. तीन कायदे परत होतील, तेव्हाच घरी जाता येईल. त्यामुळे केंद्र सरकारने आणखी किती ताणायचे ते ठरवावे. आमची मे, २०२४ पर्यंत दिल्लीत ठाण मांडून बसून राहण्याची तयारी असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य राकेश टिकैत यांनी दिली. आमदार निवास येथे पत्रपरिषदेत त्यांनी देशभर फिरून दिल्लीत येऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या राज्यातीलच जिल्हा कचेरीपुढे आंदोलन करावे असे आवाहन केले.

किसान मोर्चातर्फे २३ जानेवारीला राजभवनाला घेराव करण्यात येणार असून, २६ जानेवारीला नागपुरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. टिकैत म्हणाले, आतापर्यंत दहा फेऱ्यांची चर्चा झाली. सरकारतर्फे सकारात्मक भूमिका दाखविली नाही. सुप्रीम कोर्टाच्या समितीपुढे जायचे नाही. त्यामुळे सरकारच हे बिल मागे घेईल. शेतकऱ्यांचे आंदोलन ही वैचारिक आंदोलन आहे. भाजप व कॉंग्रेस वा इतर पक्षाविरूध्दचे हे आंदोलन नाही. कुठल्या राजकिय पक्षाला मंचावर स्थानही नाही. संसदेच्या बजेट सत्रात विरोधक सभागृहात शेतकऱ्यांची बाजू मांडतील, अशी अपेक्षा आहे. सध्याचे आंदोलन तीन कायदे मागे घ्यावे यासाठी तर आहेच. शिवाय आगामी काळात येणारे बी बीयाणांबाबतचा कायदा व इतर कायदे येऊ नये, यासाठीची तयारी आहे. कृषी उत्पादनांना हमीभाव मिळावा. यासाठी संसदेत कायदे करावेत, अशी आंदोलनकर्त्यांची स्पष्ट भूमिका आहे.

ते म्हणाले, कायद्याआधी गोदाम तयार होते. यावरून सरकारची मनिषा स्पष्ट होते. तीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांची जमीन घेऊन त्याला भूमीहीन केले जाईल. हे शेतकऱ्यांना चांगले ठाऊक आहे. म्हणूनच आंदोलन कायदे मागे घेतल्यावरच संपेल. आता आंदोलनात महिला शेतकरीही मोठया संख्येत सहभागी होत असल्याकडेही टिकैत यांनी लक्ष वेधले. पत्रपरिषदेत संयुक्त किसान मोचांचे राज्य समन्वयक संदिप गुड्डे पाटील, संयोजक श्रीकांत तराळ, लक्ष्मण वांगे, अरूण वनकर, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

मोदी कंपनी लुटण्यासाठी येत आहे

देशातील कृषी उत्पादन मोठया व्यापाऱ्यांच्या घशात टाकण्याचा डाव या काळया कायद्यात आहे. मोदी कंपनी लूटण्यास येत आहे.या मोठया व्यापाऱ्यांना कृषी उत्पादन खरेदी करण्याची एक साखळी तयार करावयाची आहे. लुटारूंचे आणखी बादशाह आहेत, असा आरोपही टिकैत यांनी केला.

शेतकरी कुटुंबीयांवर दबाव

दिल्लीतील आंदोलनासाठी ट्रॅक्टर घेऊन शेतकरी निघत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या घरी पोलिस दिवसभर ठाण मांडून बसतात. जेवणाचा डबाही सोबत असतो. कुटुंबाला दबावात ठेवतात. धमकी देतात. त्यावरही मानले नाही तर, किमान आमची नोकरी वाचवा अशी हाक देत आंदोलनात जाऊ नका, अशी गळ घालत असल्याचे टिकैत यांनी सांगितले.

देशाचे पोलिस कमकुवत नाही

आंदोलनात खलीस्तानी, विदेशी शक्ती वा इतर घुसल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. शेतकरी हे खपवून घेणार नाही. त्यापेक्षा देशातील पोलिस एवढे कमकुवत नाही. ते आंदोलनात कुणाला घुसू देणार नाहीत. हे आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याची टीकाही,टिकैत यांनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here