औरंगाबाद: मी भाजप सोडणार या अफवा आहेत. या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे नमूद करतानाच मी पक्षात कुणावरही नाराज नाही आणि कोणत्याही परिस्थितीत भाजप सोडणार नाही, असे माजी मंत्री व भाजप नेत्या यांनी आज स्पष्ट केले.

मराठवाड्यातील पाणीप्रश्नाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आज विभागीय कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. हे उपोषण पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले असले तरी भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांनी यावेळी उपस्थिती दर्शवत पक्ष पंकजा यांच्यासोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नेते पंकजा यांच्यासोबत व्यासपीठावर हजर राहिले. पंकजा यांच्या आंदोलनाला पक्षाची पूर्ण साथ असेल असा विश्वास सर्वच नेत्यांनी यावेळी दिला. तोच धागा पकडत पंकजा यांनी सर्व नेत्यांचे आभार मानताना टोलेबाजीही केली.

भाजपचे कार्यकर्ते सध्या चांगले काम करत आहेत. त्यामुळेच विरोधात असल्यावर आपण चांगले काम करतो का? विरोधात बसणंच चांगला का?, असे प्रश्न मला पडलेत अशी टोलेबाजी पंकजा यांनी केली.

‘मराठवाडा ग्रिड योजना’ बंद करण्याचा विचार सरकार करत असल्याची माझी माहिती आहे. ही योजना बंद करण्यात येऊ नये यासाठी माझे आंदोलन असून या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मी पाणीसमस्येबाबत नेमकी कल्पना त्यांना देणार आहे, असे पंकजा म्हणाल्या. विद्यमान सरकारला १०० दिवस पूर्ण होईपर्यंत मी कोणतीही टीका करणार नाही. हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही. केवळ समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण आहे, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे हे एक संवेदनशील नेते आहेत. ते निश्चितच मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष देतील, असा विश्वासही पंकजा यांनी व्यक्त केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here