या निवडणुकांसाठी मतदारांनी उत्साह दाखविल्याने सरासरी मतदान ८०.५४ टक्के झाले आहे. ७४६ ग्रामपंचायतींपैकी ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध, तर एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकला असल्याने ६४९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले.
चार हजार ९०४ जागांसाठी ११ हजार सात उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभे होते. त्यासाठी १३ लाख ८८ हजार ३१४ मतदारांपैकी ११ लाख १८ हजार १०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. सर्वाधिक मतदान हे वेल्हे तालुक्यामध्ये ८६.६९ टक्के झाले असून, सर्वांत कमी हवेली तालुक्यामध्ये ७३.९८ टक्के झाले आहे.
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये वेल्हे तालुक्यातील २०, भोरमधील ६३, दौंड येथे ४९, पुरंदर तालुक्यात ५५, इंदापूर येथे ५७, बारामतीत ४९, जुन्नरमध्ये ५९, आंबेगाव २५, खेड ८०, शिरुर ६२, मावळ ४९, मुळशीत ३६ आणि हवेली तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी तीन गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची केवळ औपचारिकता राहिली आहे. वडाची वाडी आणि औताडे-हांडेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, शेवाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये एका जागेसाठी निवडणुकीची प्रक्रिया झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times