म. टा. प्रतिनिधी, नागपूरः जिल्ह्यात आत्तापर्यंत सापडलेल्या सगळ्याच मृत कोंबड्यांचे अहवाल ‘बर्ड फ्ल्यू’च्या ( bird flu test ) दृष्टीकोनातून ‘निगेटिव्ह’ आलेत. पुण्यातील प्रयोगशाळेने या कोबंड्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हेच नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान येथेही पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा भागातील शिवारातील शेतात दोनशे मृत कोंबड्या उघड्यावर फेकल्याचे, तसेच मोहपा शिवारातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रात मृत कोंबड्या फेकल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. नदीतील मृत कोंबड्या चार ते पाच दिवसांपूर्वी फेकल्या असाव्या, असा अंदाज पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे धापेवाडा येथील पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांत १३० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच कळमेश्वर तालुक्यातील दोन पोल्ट्री फार्म आणि मौदा तालुक्यातील एका शेतातील काही कोंबड्या अचानक मरण पावल्या. मृत कोंबड्यांची संख्या तुलनेने अधिक होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने तातडीने या मृत कोंबड्यांचे नमुने घेतले. ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या सगळ्याच कोंबड्यांचे नमुने ‘निगेटिव्ह’ आलेत, अशी माहिती विभागाचे प्रमुख डॉ. युवराज केने यांनी दिली. तसेच ते म्हणाले, ‘पुण्यातील प्रयोगशाळेनुसार हे नमुने निगेटिव्ह आहेत. मात्र, खबरदारी म्हणून हे सगळेच नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान येथेही पाठविले आहेत. ही प्रयोगशाळा केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येते. त्यामुळे येथील अहवाल अधिक विश्वसनीय व ग्राह्य धरला जातो. त्यामुळे आम्ही सध्या या प्रयोगशाळेतील अहवालांच्या प्रतीक्षेत आहोत.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here