मुंबई : करोना संसर्गाचे संकट ओढवल्यापासून प्रत्येक करण्याआधी एक संदेश वाचला जातो. यासंदर्भात अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार, या संदेशामुळे नागरिकांचे दररोज सुमारे साडेदहा कोटी तास (१.३० कोटी मनुष्य तास) वाया जातात. याचा नेमका त्रास कसा होतो, याबाबत मुंबईकरांनीही आपले अनुभव मांडले आहेत.
सरकारी कंपनीत नोकरीला असलेले अनिल गांगुर्डे यांनाही या संदेशाचा त्रास होतो. गांगुर्डे म्हणाले, ‘मी माझ्या कंपनीच्या महाव्यवस्थापकांचे काम बघतो. यासाठी त्यांचे फोन सतत मलाच घ्यावे लागतात. रोज अनेकांना त्यांच्या वतीने फोन करावे लागतात. यामध्ये संदेशामुळे अडथळे येतात. सातत्याने संदेश ऐकावे लागत असल्याने रोजच्या कामाचा वेळही वाया जातो. दिवसभरात तासाभराचा वेळ वाया जातो.’ अनंता निमस्कर हे तंत्रज्ञ आहेत. घरोघरी जाऊन ते फ्रिज, वॉशिंग मशिन दुरुस्तीचे काम करतात. प्रामुख्याने मध्य व उत्तर मुंबईत ते काम करतात. ते म्हणाले, ‘अनेकदा एखादा ग्राहक कॉल करतो. या संदेशामुळे कॉल लवकर लागत नाही. त्यामुळे तो अर्धवटच कॉल बंद करतो. अनेकदा या संदेशाच्या टेपमुळे समोरच्या ग्राहकाला लवकर कॉल करता येत नाही. मला रोज साधारण दहा जणांच्या घरी जावे लागते. त्या दहा जणांना किमान तीन वेळा कॉल करावा लागतो. प्रत्येक वेळी किमान ३० सेकंदाचा संदेश ऐकावा लागतो. यानुसार १५०० सेकंद तसेच वाया जातात. अन्य कॉल असतात ते वेगळेच.’
दीपक शिरस्ते हे एका राज्य सरकारी कंपनीत निविदा संदर्भातील विभागात आहेत. ‘मला निविदेसंदर्भात दररोज किमान ४० कॉल करावे लागतात. अनेकदा एखाद्या निविदादाराचा कॉल येतो. तो उचलला न गेल्यास त्यांना पुन्हा कॉल करावा लागतो. या प्रक्रियेत संदेश ऐकण्यात वेळ जातो. मग तो निविदादार विलंब झाल्याने कॉल घेत नाही. रोजच्या किमान ४० कॉलपोटी किमान अर्धा तास वाया जातो.’
भारतातील रोजचे कॉल : ३०० कोटी
एका फोनवरील रोजचे सरासरी कॉल : ३
ऐकण्यात जाणारा वेळ : ३ कोटी तास
एकूण रोजचे नुकसान : १० कोटी तास (१.३० कोटी मनुष्य तास)
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times