पुणे: एल्गार प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आल्यानंतर त्यांचे एक पथक सोमवारी पुण्यात दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्याची कागदपत्रे ताब्यात घेण्यासंदर्भात पुणे पोलिसांशी चर्चा केली. याबाबतचे एक पत्र एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांकडे सोपवले आहे.

केंद्र सरकारने एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. एल्गार प्रकरणाच्या तपासासाठी कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी एनआयएचे एक पथक सायंकाळी पुण्यात दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्याची कागदपत्रे ताब्यात घेण्यासंदर्भात पुणे पोलिसांशी चर्चा केली. यावेळी दलातील वरिष्ठ अधिकारी, तपास अधिकारीदेखील उपस्थित असल्याची माहिती समजते. काही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा तपास एनआयएकडे वर्ग होणार असल्याचे समजते. एनआयए पथकाबाबतच्या भेटीबाबत पुणे पोलीस दलातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या एल्गार परिषद व कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणी पुणे पोलिसांनी काही मानवाधिकार कार्यकर्ते, विचारवंतांना अटक केली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार प्रकरणी एसआयटी स्थापन करून तपास करावा असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले होते. त्यानंतरच्या काही तासांतच केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला. अखेर आज एनआयएचे एक पथक पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहे. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सोपवण्याची मागणी या पथकाने पुणे पोलिसांना केली होती.

एल्गार प्रकरणातील काँग्रेसचा उल्लेख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, काश्मीर आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा संबंध, असे मुद्दे वेंकटेशम यांच्या तपासात समोर आले. एल्गार प्रकरणी सुरेंद्र गडलिंग, सुधा भारद्वाज, शोमा सेन, वरवरा राव, अरुण परेरा, व्हर्नन गोन्सालवीस, महेश राऊत आजही कारागृहात बंद आहेत. नक्षलवाद्यांशी संबंध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखल्याच्या संशयावरून या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले. या प्रकरणाची पोलीस कारवाई वादग्रस्त ठरली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here