कणकवली तालुक्यातील भिरवंडे ग्रामपंचायतीची सत्ता शिवसेनेकडे गेली आहे. हा राणे कुटुंबाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. त्यानंतर नितेश राणेंनी मात्र ७० पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपनं जिंकल्या आहेत. असा दावा केला आहे. तसंच, राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
कणकवलीतील भिरवंडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे. या निकालावरही नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘भिरवंडेमध्ये आम्हाला ३६ – ३० मतं मिळायची तिथं आज आम्ही दोनशे- तीनशे मतांवर पोहोचलो आहोत. त्यामुळं भिरवंडेमध्ये हा एकप्रकारे शिवसेनेचा नैतिक पराभवच आहे, ‘असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. तसंच, ‘तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीवर २५ वर्षांनी भाजपची सत्ता आली आहे,’ असंही ते म्हणाले.
‘सिंधुदुर्गात एकहाती सत्ता भाजपनं मिळवली आहे. सावंतवाडीत अजूनही निकालाची काउंटिग सुरु आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृषी कायद्याचा विजय आहे. कोकणातील कृषी कायदे स्वीकारले आहेत. गावाचा विकास भाजपच करु शकते असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळंचं हा विजय मिळाला आहे,’ असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपनं देवगडमध्ये २३ पैकी १८, वैभववाडी १२ पैकी ९, कणकवली ३ पैकी १, मालवणमध्ये ६ पैकी ५ तर, कुडाळमध्ये ८ पैकी ४ जागांवर सत्ता मिळवली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times