लोकसभा निवडणूक हरल्यामुळे आता अशोक चव्हाण खूश असतील. किमान त्यांना मंत्री होता आले. तो आनंद सुद्धा किती काळ टिकेल, हे आज सांगता येत नाही, असे नमूद करतानाच केवळ सत्तेसाठी एकत्र आले तर ते सरकार फार काळ टिकत नाही. एकत्र येण्यासाठी समाजकारण करावे लागते, असा टोला फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याआधी सोनिया गांधी यांनी लेखी हमी घेतल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे. राज्य सरकारला संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे लागेल, अशी ही लेखी हमी होती, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यावरून फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. अशोक चव्हाण यांना नेमके काय सांगायचे आहे? कालपर्यंत शिवसेना संविधानाप्रमाणे वागत नव्हती का? की उद्धव ठाकरे सोनियांच्या दरबारी खरोखर तसे पत्र घेऊन गेले. अशी लाचारीची स्थिती आमच्या जुन्या मित्रांवर येत असेल, तर त्याचे आम्हाला वाईट वाटते, असा टोला फडणवीसांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्याआधी शिवसेनेने कोणते करार केले हे जनतेला कळायला हवे. शिवसेनेवर जर सरकारमधील अन्य पक्षांचा विश्वास नसेल तर शिवसेना सरकारमध्ये का आहे?, असा सवालही फडणवीस यांनी केला.
यापेक्षा जास्त लोक लंगरमध्ये जेवतात!
भारतीय नागरिकत्व कायद्याबाबत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मान्य आहे की नाही, याचेही उत्तर आता शिवसेनेला द्यावे लागेल, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. गरिबाची थट्टा कशाला करता, असे म्हणत फडणवीस यांनी शिवभोजन योजनेवर टीकास्त्र सोडले. १२ कोटींच्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार लोकांना जेवण देण्यात येत आहे. नांदेडमध्ये तर अवघ्या ५०० लोकांनाच याचा लाभ मिळतोय. यापेक्षा अधिक लोक तर गुरुद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात. तेही मोफत, अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times