मुंबईः आज राज्यात १ हजार ९२४ करोनाचे नवीन रुग्ण सापडले असून ३५ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात करोना रुग्णवाढीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून वाढत असताना आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, आज करोना बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज फक्त १ हजार ९२४ रुग्ण सापडले आहेत. इतक्या कमी संख्येनं रुग्ण आढळल्यानं काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या १९ लाख ९२ हजार ६८३ इतकी झाली आहे.

आज राज्यात ३ हजार ८५४ रुग्णांनी करोनावर मात केली असून आजपर्यंत राज्यात १८,९०,३२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण वाढीचा दर ९४.८६% टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात सध्या ५० हजार ६८० अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,४५,८९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९२,६८३ (१४.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात आज करोना संसर्गाच्या साथीमुळं ३५ जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात करोना मृतांचा एकूण आकडा ५० हजार ४७३ इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. सध्या राज्यात २,२१,२८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here