मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकात राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील आंदोलनांची दखल घेतल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा ( b s yediyurapp ) यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला दिली जाणार नाही. निव्वळ राजकारणासाठी अशी उद्धव ठाकरे यांनी अशी वक्तव्य करणं बंद करावं, असं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना येडियुरप्पा म्हणाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याची भाषा करणं ही अतिशय खेदाची बाब आहे. संघराज्याच्या मुख्य तत्वांचे पालन आणि त्याबद्दलची कटिबद्ध दाखवत श्री उद्धव ठाकरे यांनी खरे भारतीय असल्याचं दाखवून द्यावं अशी अपेक्षा आहे, येडियुरप्पा म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याविरोधात कर्नाटकात अनेक संघटनांनी निदर्शनं केली. एवढचं नव्हे तर अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचं दहन केलं गेलं. तर महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी ‘हुतात्मा दिन’ आयोजित केला होता. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रात दरवर्षी १७ जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे.
‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा..! कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!’, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या अभिवादन संदेशात नमूद केले आहे.
काय आहे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद?
१९५६ मध्ये १७ जानेवारीला बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर आणि महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांनी लढा सुरू केला. हा लढा सुरूच आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times