मुंबई:
कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे पुन्हा बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिककरांना चालून आली आहे. साधारणपणे दहा दिवसांपूर्वी मुंबई थंडीने गारठून गेली होती; पण अवघे पाचेक दिवस. त्यानंतर थंडी धूम पळाली. आता गेले दोन दिवस तर मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच थंडीची पुन्हा चाहूल लागली आहे. मंगळवारी २८ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत तापमापकाचा पारा पुन्हा घसरणार आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत थंडीचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे. गुजरात आणि महाराष्ट्रासह मध्य भारतात २८ ते ३० जानेवारी या कालावधीत कमाल आणि किमान तापमान घसरणार आहे. मुंबई, नाशिक, पुण्यातही याचा परिणाम दिसून येणार आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली.

२९ जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये किमान तापमान १० ते १२ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. ३० जानेवारी रोजी देखील मध्य महाराष्ट्र गारठलेलाच असणार आहे.

मुंबईत पुन्हा हुडहुडी

मुंबईत २८ ते ३० जानेवारी पारा गोठलेला असेल. मात्र त्यातही २९ जानेवारी रोजी मुंबईत किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा बोचऱ्या थंडीचा आनंद घेता येणार आहे.

दरम्यान, १७ जानेवारीला मुंबईत विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईचा तापमापकाचा पारा तब्बल १२.३ अंशांपर्यंत घसरला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here