तांडव वेबसिरीजचा वाद वाढल्यानंतर निर्मात्यांनी याबाबत माफीनामा सादर केला आहे. मात्र, तरीही हा वाद शांत होताना दिसत नाहीये. आता केवळ माफीने काम चालणार नाही, त्या सर्वांना आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा पवित्राच राम कदम यांनी घेतला होता. तसंच, महाराष्ट्र सरकार मुंबई पोलिसांना तक्रार दाखल करण्यापासून रोखतेय, असा आरोप करत त्यांनी सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली होती.
घाटकोपर येथील पोलीस स्टेशनच्या बाहेर राम कदम आणि त्यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. तसंच, सरकारविरोधात घोषणाबाजीही सुरु केली होती. त्याचवेळी पोलिसांकडून राम कदम यांना ताब्यात घेण्यात आलं.
राम कदम यांचं ट्विट
आमचा आवाज दाबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मला व काही राम भक्तांना ताब्यात घेतलं. अजून किती जणांचा आवाज दाबणार आहात?, ज्यांनी हिंदू देवी देवतांचा अपमान केला ते एसीमध्ये बंगल्यात आहेत आणि न्यायाची मागणी करणारे तुरुंगात, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.
काय आहे वाद?
तांडव वेबसिरीजची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत एका दृश्यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळं हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच, निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times