मुंबईः राज्यात आज ५० करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४ हजार ५१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. ()

राज्यात गेल्या नऊ महिन्यांपासून करोना विषाणूच्या संसर्गानं विळखा घातला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. करोनावर मात करण्यासाठी राज्यात आरोग्य सुविधा उभ्या करण्यात आल्या होत्या. आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. करोनाच्या रोजच्या आकडेवारीत मोठा फरक दिसू लागला आहे.

आज आरोग्य विभागानं करोनाची आकडेवारी जारी केली आहे. आजही नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात आज ४ हजार ५१६ रुग्ण बरे झाले असून २ हजार २९४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १८,९४,८३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४. ९८% एवढे झाले आहे.

गेल्या २४ तासांत ५० करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील करोना मृतांची एकूण संख्या ५० हजार ५२३ इतकी झाली आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात सध्या ४८ हजार ४०६ अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,९५,२७७ चाचण्यांपैकी १९,९४,९७७ (१४.३६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१८,०५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here