जगातील सर्वाधिक मोठ्या झोपडपट्टीत करोनाने शिरकाव केल्यानंतर मुंबईकरांची चिंता वाढली होती. धारावीतील करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. धारावीत सुरूवातीस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात होती. कालांतराने महापालिका, आरोग्य विभाग, खासगी डॉक्टर, वैद्यकीय चमूच्या सहाय्याने त्यावर नियंत्रण आणण्यात यश आले. त्यासाठी पालिकेने उपचार पद्धती, कंटेनमेंट झोनमध्ये उपाययोजना, सर्वेक्षणासारखे उपक्रम हाती घेतले. धारावीत रुग्णसंख्या कमी झाली असून दादर आणि माहीममध्येही तेच चित्र दिसत आहे.
धारावीत सध्या १६ बाधित रुग्णांवर सध्या प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. धारावीत आतापर्यंत करोनाचे एकूण ३ हजार ८९८ रुग्ण सापडले असून ३ हजार ५७० रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. बरे झालेल्या या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दादरमध्येही रुग्णसंख्या आता कमी होऊ लागली आहे. आज दादरमध्ये ७ रुग्णांची भर पडली आहे. दादरमध्ये एकूण ४ हजार ८९५ जणांना करोना संसर्गाची लागण झाली असून त्यातील ४६२५ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत तर ९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
धारावीला लागून असलेल्या माहीममध्येही करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. माहीममध्ये आज फक्त २ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या ४ हजार ७१५ इतकी झाली आहे. आतापर्यंत यापैकी ४ हजार ४५५ रुग्ण बरे झाले असून ११६ अॅक्टिव्ह रुग्णांवर सध्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
धारावी, दादर, माहीम हा भाग मुंबई पालिकेच्या जी उत्तर विभागात येतो. या विभागात आज एकूण १२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यासोबतच विभागातील एकूण रुग्णसंख्या १३ हजार ५०८ इतकी झाली असून त्यातील १२ हजार ६५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार विभागात सध्या २२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times