मुंबईः अभिनेता सैफ अली खानची वेबसिरीज तांडव वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. देशभरातून या वेबसिरीजविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी तांडवविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीसही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी वेबसिरीजविरोधातील वाढता तणाव लक्षात घेत अलीकडेच जाहीर माफी मागितली होती. मात्र, तरीही हा वाद काही थांबण्याचे चिन्ह नाहीत. ‘तांडव’विरोधात अनेक राज्यात तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी ‘तांडव’चे निर्माता व दिग्दर्शकांची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळं ‘तांडव’च्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

‘मुंबई पोलिसांकडून आम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य मिळतंय, ‘तांडव’ प्रकरणी अद्याप कुणाचीही चौकशी झालेली नाहीये’, असं उत्तर प्रदेशचे पोलिस अधिकारी अनिल सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ‘तांडव’ वेबसिरीजबाबत आमच्याकडे तक्रार आली असून त्यावर नियमाने कारवाई होईल, असं स्पष्ट केलं आहे. तसंच, सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मर्सवर कोणतंही नियंत्रण नाही, त्यामुळं केंद्र सरकारने याबाबत कायदा करावा, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.

काय आहे वाद?

‘तांडव’ वेबसिरीजची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत एका दृश्यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळं हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपनंही या वेबसिरीजचा तीव्र विरोध केला असून राम कदम यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here