मुंबईः ‘मुख्यमंत्र्यांना गाडी कशी चालवायची ही माहीती असेल, पण सरकार चालवण्याचा त्यांचा अभ्यास नाही. त्यामुळं सरकार पुढे जात नाहीये. आज पगार होत नाहीये याला कारण उद्धव ठाकरेच आहेत,’ असा घणाघाती आरोप भाजपचे खासदार यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नारायण राणे यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री ठाकरे होते. राज्य सरकार, कृषी विधेयक, ठाकरे सरकारमधील मतभेद याविषयांवर राणेंनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ‘मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास त्यांच्याकडे नाहीये. ना त्यांना खड्डे माहितीये, ना राज्याची तिजोरी माहितीये. उद्धव ठाकरेंचा त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश नाहीये. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला आहेत. शिवसेना कलेक्टरसारखे सगळीकडे कलेक्शनला फिरतायेत,’ असा खोचक टोलाही राणेंनी लगावला आहे.

‘शरद पवार आणि मुख्यमंत्री दोघंही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात जाणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी मोदींनी कृषी विधेयक आणलं आहे. त्याला हे विरोध करतायेत हे राजकीय आंदोलन आहे, असं राणेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं कोणतही काम महाविकास आघाडीचं सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसेच नाहीत. आज सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. एसटीचे पगार दोन-तीन महिने होत नाहीयेत. आज सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. आधी त्यांनी ती सुधारावी नंतर त्यांनी रस्त्यावर यावं. निदान मातोश्रीच्या बाहेर मुख्यमंत्री पडतील आणि आमचा मुख्यमंत्री असा आहे हे लोकं बघतील तरी, असं टोला राणेंनी लगावला आहे. तसंच, यापूर्वी शरद पवार हेच विधेयकासाठी प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकायची परवानगी आहे. मग विरोध कशाला. धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?, असा सवालच नारायण राणे यांनी केला आहे.

हे सरकार पाच वर्ष टिकणार नाही. पण कधी पडणार हे मी सांगणार नाही. हे गुपित वेळ आल्यावरच सांगणं योग्य आहे, असे राणे यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब वरुन पाहत असतील तर अशा पुत्राला काय म्हणत असतील, असं म्हणत नारायण राणेंनी औरंगाबाद नामांतरावरून ठाकरेंवर निशाणा साधला आहे. औरंगाबादमध्ये संभाजीनगर म्हणून बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं. मुलगा मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही हे दुर्दैव आहे. साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रीपद मोठं वाटतं. एक तर लाचारी करुन पद मिळवलं, त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. औरंगाबादचं संभाजीनगर जाहीर करायचं सोडून टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत. ही शिवसेना नाही. आम्ही होतो ती वेगळी आणि आत्ताची शिवसेना वेगळी आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here