‘डीपीसी’ची मागील बैठक १७ जानेवारी २०२० रोजी झाली होती. त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव; तसेच शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवडणुका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रियेमुळे ही बैठक होऊ शकली नव्हती. आता ही बैठक येत्या सोमवारी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शिल्लक निधीचा घेतला जाणार आढावा
गेल्या वर्षीचा ‘डीपीसी‘चा आराखडा हा सुमारे ५२० कोटी ७८ लाख रुपयांचा होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी सुमारे १७८ कोटी २१ लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीला गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मान्यता दिली आहे. ‘डीपीसी’तील विकासकामांचा निधी हा करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरल्यानंतर शिल्लक निधी हा विकासकामांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधींकडून आलेल्या अनेक प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र, निधी वितरण करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या आराखड्यातील किती निधी शिल्लक राहिला आहे आणि निधी शिल्लक राहण्यामागील कारणांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ‘डीपीसी’अंतर्गत रस्ते तयार करणे, पाणीपुरवठा योजना राबविणे, वाचनालये, अभ्यासिका, ग्रंथालये, बालवाडी सुरू करणे, सांस्कृतिक केंद्र, सभामंडप बांधणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे, उद्यानांचे सुशोभिकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामे सुचविण्यात आली आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times