म. टा. प्रतिनिधी, जळगावः ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या थकीत कर्जाच्या हप्त्यांवरील व्याजासह मुळ रकमेत सुट मिळवून देण्यासाठी बँक ऑफ बडोदाचा वसुली अधिकारी प्रशांत विनायक साबळे (वय ४२, रा. औरंगाबाद) याने वृद्ध शेतकऱ्याकडे २० हजारांची लाच मागीतली. या प्रकरणी पुण्याच्या सीबीआय पथकाने साबळे याला मंगळवारी (दि.२०) अटक केली. साबळे याला अटक ( cbi arrests bank officials ) करण्यासाठी तसेच संपुर्ण प्रकरण समजुन घेण्यासाठी सीबीआयचे पथक गेल्या आठ दिवसांपासून जळगावसह चाळीसगाव शहरात ठाण मांडून होते. आज बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील लोंढे या गावात राहणारे सुभाष काशिनाथ राणे (वय ६८) यांनी २०१० मध्ये चाळीसगावातील देना बँकेच्या शाखेतून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. देणा बँकेचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले. दरम्यान, राणे यांनी बँकेचे काही हप्ते भरले नव्हते. त्यामुळे त्यांची बँकेच्या दप्तरी थकबाकीदार म्हणून नोंद झाली. आता दहा वर्षांनंतर म्हणजेच ८ जानेवारी २०१२ रोजी वसुली अधिकारी साबळे हा राणे यांच्या घरी गेला होता.

राणे यांनी घेतलेल्या पाच लाख रुपयांचे कर्जाचा एकही हप्ता न फेडल्यामुळे व्याजासह १२ लाख रुपये झाले असल्याची माहिती त्याने दिली. थकबाकी लवकर न भरल्यास ट्रॅक्टर जप्त करण्यात येईल असेही त्याने सांगीतले. ट्रॅक्टर जप्त न करण्याची विनंती राणेंनी केली होती. कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच साबळेने मागीतली होती. त्यावेळी राणेंनी त्याला १० हजार रुपये दिले. यानंतर १२ जानेवारी रोजी साबळेने पुन्हा एकदा येऊन राणेंकडे १० हजार रुपये मागीतले. तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने १२ लाख रुपयांचे कर्ज केवळ ५ लाख ४० हजार रुपये करुन देतो असे आमीष त्याने दिले होते. त्यापोटी पुन्हा २० हजार रुपये मागीतले होते.

दरम्यान, राणे यांनी एसीबी व सीबीआयकडे साबळेची तक्रार केली होती. त्यानुसार पुणे येथील सीबीआय पोलीस निरिक्षक महेश चव्हाण यांनी राणे यांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी केली. तसेच राणे व वसुली अधिकारी प्रशांत साबळे यांच्या संभाषणात केलेल्या तक्रारीनुसार तथ्य पथकाला आढळून आले. त्यांनी राणेंच्या सर्व आरोपांची चौकशी केली. खात्री पटल्यानंतर मंगळवारी रात्री साबळे याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. यानंतर साबळेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी साबळेला न्यायाधिश आर. जे. कटारीया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. गुरुवारी साबळे याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here