‘टीआरपी’ घोटाळा प्रकरणात मुख्य सूत्रधारांपैकी एक ‘बार्क’चा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) याला मुंबई सत्र न्यायालयाकडूनही जामिनाचा दिलासा मिळू शकला नाही. मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयानंतर सत्र न्यायालयानेही बुधवारी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता दासगुप्ताला जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.
‘पार्थो दासगुप्ताने या कथित घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे’, असे निरीक्षण नोंदवून न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. याविषयी मंगळवारी सुनावणी झाल्यानंतर न्या. एम. ए. भोसले यांनी राखून ठेवलेला निर्णय बुधवारी जाहीर केला. मुंबई पोलिसांतर्फे या जामीन अर्जाला विरोध दर्शवताना विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दासगुप्ताचे ”चे मुख्य संपादक यांच्यासोबत व्हॉट्सअॅपवर झालेले संभाषण न्यायालयाला दाखवले.
‘या प्रकरणात मुख्य आरोपपत्र आणि दोन पुरवणी आरोपपत्र दाखल झाले असले तरी अजूनही बऱ्याच गोष्टींचा तपास होणे बाकी आहे. अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात न्यायालयासमोर जे येते ते हिमनगाच्या टोकासारखे असते. हा घोटाळाही मोठा असून त्यातील अनेक बाबींचा तपास बाकी आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास अजून सुरू आहे. आरोपी दासगुप्ता हा सर्वोच्च पदावर होता आणि त्याचे या संपूर्ण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आहे. त्यामुळे त्याला जामीन दिला तर त्याच्या हाताखाली काम केलेल्या व्यक्ती, ज्या सरकारी पक्षाचे साक्षीदार आहेत, त्यांच्यावर तो दबाव आणू शकतो. त्याचबरोबर या प्रकरणातील पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात यावा’, असा प्रभावी युक्तिवाद हिरे यांनी अॅड. अंकुर पहाटे व अॅड. सई सावंत यांच्या सहाय्याने मांडला होता.
‘पोलिसांनी दासगुप्ताचे लॅपटॉप, कम्प्युटर, आयपॅड फोन सर्व जप्त केले आहे आणि त्याने इतरांशी जे काही संभाषण केले आहे ते सर्व हस्तगत केले आहे. त्याचे आणि त्याची पत्नी व मुलींचे बँक खातेही गोठवण्यात आले आहेत. त्यामुळे दासगुप्ताला आणखी कोठडीत ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. या प्रकरणातील सर्वच आरोपींची जामिनावर सुटका झालेली आहे’, असा युक्तिवाद दासगुप्तासाठी अॅड. शार्दुल सिंग यांनी मांडला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times