पुणेः करोना प्रतिबंधक कोवॅक्सिन लशीची निर्मिती करणाऱ्या सीरम इस्टिट्यूटमध्ये गेल्या तीन तासांपासून आगीनं थैमान घातलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी एक ट्विट करुन महत्त्वाची माहिती दिली आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास सीरम इन्सिट्यूटच्या मांजरी येथे असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. आगीच्या घटना कळताच अग्निशमन दलानं तातडीने दखल घेत घटनास्थळी धाव घेतली होती. या आगीत चार कर्मचारी अडकले होते. त्यातील ३ कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं होत. तर, एका कर्मचाऱ्याचा शोध घेण्यात येत होता. याबाबत अदर पुनावाला यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

‘आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून कोणताही जिवितहानी झाली नाहीये, असं पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, सध्याच्या घडीला आगीत काही मजल्यांचे नुकसान झालं आहे. पण तुम्ही दाखवलेली काळजी आणि प्रार्थनासाठी आभार,’ असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, करोनाची लस सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. गुप्तचर यंत्रणेने ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे की अन्य काही कारणांमुळे याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here