म. टा. प्रतिनिधी, मुंबई

प्रजासत्ताक दिन संचलनात ‘एलसीए तेजस’चे राजपथावरील उड्डाण पक्ष्यांमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आले. ‘फ्लायपास्ट’ अर्थात हवाई सलामीआधी तिथे पक्ष्यांचा वावर असू नये, यासाठी हवाईदलाच्या हेलिकॉप्टर्सकडून विशेष खबरदारी बाळगली जाते. पण तरीही पक्षी आडवे आल्याने ‘तेजस’ची सलामी ऐनवेळी रद्द झाली. हे पक्षी कसे आले, याबाबत आता हवाईदल चौकशीही करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिन संचलनात अखेरच्या टप्प्यात विमान व हेलिकॉप्टर्सने हवाई सलामी दिली. या सलामीची सांगता ‘एलसीए तेजस’ विमानांच्या उड्डाणाने होणार होती. पण तेजसच्या आधी आलेल्या ‘सी १७ ग्लोबमास्टर’ या अवजड वाहतुकीच्या विमानांच्या उड्डाणावेळी चार-चार पक्षी आडवे आले होते. ‘सी १७’ नंतर जग्वार व सुखोई विमानांनी उड्डाणे केली. पण ‘तेजस’ काही आले नाही.

याबाबत हवाईदलातील सूत्रांनी सांगितले की, ‘सी १७ विमानांनी जमिनीपासून ३०० फुटांवर उड्डाण केले. त्यानंतर आलेली जग्वार व सुखोई विमाने ९०० फुटांवरून गेली. पण तेजस विमान साधारण ५०० फुटांवरून उड्डाण करणार होते. त्या उंचीवर पक्षी होते. त्यातून तेजस हे लहान आकाराचे विमान आहे. यामुळे पक्षी आडवे आले असते तर भीषण अपघाताचा धोका होता. यामुळेच त्यांचे उड्डाण करण्यात आले नाही, असे संकेत संबंधितांकडून मिळाले आहेत.’

कुठल्याही ‘फ्लायपास्ट’वेळी पक्षी मध्ये येऊ नये, यासाठी हवाईदलाची विशेष रचना असते. हवाईदलातील ‘चेतक’ व ‘चीता’ हेलिकॉप्टर्स विशिष्ट पद्धतीने पूर्णवेळ आकाशात उडत असतात. पक्ष्यांना दूर करण्याची जबाबदारी या हेलिकॉप्टरच्या वैमानिकांवर असते. हवाई सलामी सुरू होण्याच्या आधी एक तास ते संपेपर्यंत हे हेलिकॉप्टर त्या परिसरात उडत असतात. तसे असतानाही पक्षी राजपथावर विमानांच्या उड्डाण रेषेत कसे काय आले, याबाबत हवाईदलाकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. पक्षी उड्डाणरेषेत आल्यास मोठ्या अपघाताचा धोका असतो. त्यामुळेच हा विषय हवाईदलाकडून गांभीर्याने घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here