म. टा. प्रतिनिधी नागपूर: अवैधरित्या बळकाविलेल्या सरकारी जमिनीच्या वादातून एका तरुणाची भरबाजारात गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री १०च्या सुमारास खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजबाबा बार समोर घडली. प्रशांत मुकेश घोडेस्वार असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत या घटनेचा छडा लावत सर्व आरोपींना अटक केली आहे.

कासिम अयुब पठाण (वय ३८), सागर कृष्णराव माहूरकर (वय ३०), सुधीर भागवतराव पिपळे (वय ३६), आशिष सुरेश भड (वय ३१), सुलतान रहीम (वय २०) आणि आनंद रामभाऊ शिंदे (वय ३०, रा. सर्व राहणार खापरखेडा) अशी आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी सुधीरने या परिसरातील एक सरकारी जमीन अवैधरित्या बळकावली होती. त्याने या जमिनीचा सौदा सागर माहूरकरशी एक लाख रुपयांत केला होता. मृतक प्रशांतला हीच जमीन पानठेला लावण्यासाठी हवी होती. यावरून सुधीर व प्रशांतमध्ये वाद सुरू होता. प्रशांत त्याला या जागेच्या सौद्यातील ५० हजार रुपये मागत होता. बुधवारी रात्री प्रशांत राजबाबा बारसमोर उभा असताना आरोपींनी त्याला गाठले. गळा चिरून त्याची हत्या केली. घटनेनंतर सर्व आरोपी अकोल्याला पळून गेल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचे गांभीर्य बघता पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक अनिल जिट्टेवार, राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, जावेद शेख, लक्ष्मीप्रसाद दुबे, विनोद काले ,रमा आडे, अरविंद भगत, सत्यशील कोठारे यांनी आरोपींना अटक केली.

जमिनीचे अनेक वाद

खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक सरकारी जमिनींवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने महाजेनकोच्या जागांचा समावेश आहे. या जागांच्या खरेदी-विक्रीचे अ‌वैध व्यवहार सर्रास सुरू असतात. यामुळे खापरखेडा पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here