नागपूरः कारागृहातील बंदीवानांना चरस पुरवठा करणाऱ्या कारागृह रक्षकास रंगेहात पकडण्यात आले. रक्षकच कैद्यांना अमलीपदार्थाचा पुरवठा करीत असल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात उघडकीस आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धंतोली पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून रक्षकाला अटक केली. मंगेश मधुकर सोळंकी (वय २८, रा. सहकारनगर), असे रक्षकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी मंगेश व अन्य चार रक्षक कारागृहात कर्तव्यावर हजर होण्यासाठी आले. कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमारे व अन्य अधिकारी कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी कर्मचारी व रक्षकांची झडती घेत होते. झडती घेताना मंगेश घाबरला. कुमरे यांचा संशय बळावला. अधिकाऱ्यांनी त्याचे मोजे तपासले. त्यात दोन ‘पुड्या’ दिसल्या. त्या उघडून बघितल्या असता २८ ग्रॅम चरस आढळली. कुमरे यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच धंतोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी मंगेश याला अटक केली. गुरूवारी पोलिसांनी मंगेश याला न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here