मूळचा पाकिस्तानी असलेला गायक अदनान सामीला मानाचा पद्मश्री पुरस्कार देण्यावरुन संगीत क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटतोय. ‘आपल्याकडे संगीत क्षेत्रात योगदान असलेली अनेक मंडळी असताना अदनान कशासाठी?’ असा सवाल मराठी संगीतसृष्टीतून विचारला जातोय.

मुंबई टाइम्स टीम

गायक-संगीतकार अदनान सामीला देशातला मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आणि संगीत क्षेत्रातून त्याविरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली. केंद्र सरकारच्या निर्णयाला संगीत क्षेत्रातून विरोध होताना दिसतोय. काही राजकीय पक्षांनीही याला विरोध दर्शवला आहे. ‘मुळात आपल्याकडे संगीत क्षेत्रात ज्यांचं मोलाचं योगदान आहे अशी अनेक नावं आहेत. ती नावं डावलून अदनानला पद्मश्री देण्याचं काय कारण? त्यानं देशासाठी एवढी महत्त्वाची कामगिरी केली आहे का?’ असा शब्दांत संगीत क्षेत्रातली काही मंडळी नाराजीला मोकळी वाट करून देत आहेत.

मराठी संगीतविश्वातल्या काही मंडळींशी ‘मुंटा’नं संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. संगीतकार राहुल रानडे म्हणाला की, ‘अदनान सामी हा मूळचा पाकिस्तानी आहे किंवा गेली काही वर्ष भारतीय नागरिक म्हणून तो भारतातच वास्तव्यास आहे ही बाब तितकीशी महत्त्वाची नाही. पद्मश्री पुरस्कार देण्याचा निर्णय हा संबंधित सरकारचा असतो. परंतु, तो देताना त्या व्यक्तीचं योगदानदेखील विचारात घ्यायला हवं. आपण नेमकं कुणाच्या पंक्तीत याला बसवतोय याचं परीक्षण सरकारनं करायला हवं. भारतातल्या दिग्गज संगीतकारांइतकं अदनानचं भारतीय संगीतविश्वात खरंच काम आहे का?’ संगीतकार सलील कुलकर्णी सांगतो की, ‘पुरस्कार जाहीर करण्याआधी त्या व्यक्तीनं भारतासाठी इतकं काम केलं आहे का? हे पुरस्कार निवड मंडळानं आधाी पाहायला हवं होतं. अदनान सामी आता भारतीय नागरिक आहेत. पण, भारतात अशी इतर अनेक नामवंत मंडळी आहेत जे जन्मानं भारतीय आहेत आणि भारतीय संगीत क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यामुळे मूळच्या भारतीय असणाऱ्या संगीतकारांना या पुरस्कारासाठी प्राधान्य दिलं जायला हवं.’

अदनानला हा पुरस्कार देण्यामागे राजकीय वरदहस्त असल्याचं बोललं जात आहे. परंतु, याविषयी संगीतकार कौशल इनामदार म्हणाला की, ‘या पुरस्कारामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे असं मला तरी वाटत नाही. अदनान सामी पाकिस्तानी आहे म्हणून त्याला पुरस्कार दिला जाऊ नये हे म्हणणं चुकीचं आहे. आता तो भारतीय नागरिक आहे त्यामुळे त्याच्या नावाचा पुरस्कारासाठी विचार केला जाऊ शकतो. कोणाला पुरस्कार द्यावा हा सर्वस्वी केंद्र सरकारच्या निवड समितीचा निर्णय आहे.’ त्याचप्रमाणे गायिका उत्तरा केळकर म्हणतात की, ‘अदनान सामीला जरी भारतीय नागरिकत्व जरी मिळालं असलं तरी तो मूळचा पाकिस्तानचा आहे हे नाकारता येणार नाही. म्हणूनच अशा बहुमूल्य पुरस्कारचा मान नेहमीच जे मूळचे भारतीय नागरिक आहेत अशा दिग्गज व्यक्तींनाच मिळायला हवा.’

गेल्या वर्षी शंकर महादेवन यांना आणि यंदा सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोन दिग्गज संगीतकारांइतकं खरंच अदनानचं भारतीय संगीतविश्वात काम आहे का असा हा प्रश्न मला पडला आहे.

राहुल रानडे, संगीतकार

अदनान चांगला गायक असेल आणि त्यासाठी त्यानं संघर्षही केला असेल. पण तो संघर्ष त्यानं भारतात राहून केलेला नाही. म्हणूनच हा मान अशा व्यक्तींना मिळायला हवा जे जन्मापासून भारतात राहून संघर्ष करून मोठे झाले आहेत.

उत्तरा केळकर, गायिका

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here