वाचा:
मांजरी येथे सीरम कंपनीमध्ये बीसीजी प्लांटच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर दुपारी दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच पुणे पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जात आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या चारही कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली होती. याबाबत सीरमचे सीईओ यांनीही एक ट्वीट केलं होतं. ‘आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. आगीत कुणीही जखमी झालेलं नाही व कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही मजल्यांचे मात्र नुकसान झाले आहे’, असे अदर पुनावाला यांनी नमूद केले होते.
वाचा:
पुनावाला यांच्या ट्वीटनंतर काही वेळातच या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आग आटोक्यात आल्यानंतर इमारतीत तपासणी केली असता पाच मृतदेह आढळून आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
शेवटच्या मजल्यावर आढळले मृतदेह
मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत तपशीलवार माहिती दिली. सहा मजली इमारतीत ही आग लागली. ही निर्माणाधीन इमारत आहे. सुरुवातीला आतमध्ये चार जण अडकले अशी माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करून या चारही जणांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, आग आटोक्यात आल्यानंतर शेवटच्या मजल्यावर जवान पोहचले असता तो मजला जळून खाक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिथेच पाच मृतदेह आढळले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते सीरमचे कर्मचारी आहेत की बांधकाम कर्मचारी ते आताच सांगता येणार नाही. मृतदेह ताब्यात घेऊन पुढे पाठवण्यात आले आहेत, असे मोहोळ यांनी सांगितले. इमारतीचं बांधकाम चालू होतं. वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडून आग लागल्याचे सांगितले जात आहे मात्र, अद्याप नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, असेही मोहोळ म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times