अहमदनगर: जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला यावेळी प्रथमच पक्षीय रंग आला असून भाजपविरुदध महाविकास आघाडी, असे स्वरूप प्राप्त होत आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे दोन्ही बाजूंनी उमेदवारांची मोट बांधणे कठीण जात असल्याने महाविकास आघाडीचे निर्णय ज्येष्ठ नेते तर भाजपचे निर्णय विरोधीपक्ष नेते यांच्यावर अवलंबून आहेत. भाजपच्या नेत्यांची बैठक फडणवीस यांनी यापूर्वीच घेतली तर रविवारी पवार नगरच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. दरवेळीप्रमाणे बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात यांच्यातच खरी लढत होणार असली तरी त्याला यावेळी पवार- फडणवीसांच्या संघर्षांची किनार असणार आहे.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली असली तरी त्यापूर्वीच प्रक्रिया सुरू झालेल्या नगरच्या जिल्हा बँकेची निवडणूक मात्र होणार आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत २५ जानेवारी आहे. २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आजीमाजी आमदार आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्हा बँकेवर येथील सहकारी आणि खासगी कारखाने तसेच अन्य सहकारी संस्था अवलंबून आहेत. त्यामुळे ही बँक ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून अटोकाट प्रयत्न केला जातो. आतपर्यंतचे राजकारण पहाता निवडणुकीला थेट पक्षीय स्वरूप आलेले नव्हते. स्थानिक पातळीवर नेत्यांचे गटच आघाड्यांच्या नावाने निवडणूक लढवत होते. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आता भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे गट असतात. गेल्या अनेक वर्षांपासून थोरात यांच्या तब्यात बँकेची सत्ता होती. विखेंच्या ताब्यात बँक जाऊ नये, यासाठी विविध पक्षातील नेते मंडळींनी थोरातांना साथ दिल्याचेही पहायला मिळाले. तर काँग्रेसमध्ये असूनही विखेंनी अनेकदा भाजपच्या नेत्यांची साथ घेतल्याचेही पहायला मिळाले.

वाचा:

यावेळी मात्र भाजपने पक्षीय पातळीवर ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विखे यांचाच पुढाकार आहे. मात्र, सध्या भाजपमध्ये असलेल्या अनेक नेत्यांनी पूर्वी थोरात यांच्यासोबत बँकेची निवडणूक लढविलेली आहे. शिवाय निधानसभा निवडणुकीनंतर विखेंच्या विरोधात ज्या तक्रारी झाल्या होत्या, त्या करणारे नेतेच बँकेशी संबंधित आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर या नेत्यांची एकत्रित मोट बांधणे अवघड असल्याने वरिष्ठ पातळीवर फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये निवडणुकीसाठी विखे, माजी मंत्री राम शिंदे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची समिती निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आली आहे. सोबतच फडणवीस स्वत: यामध्ये लक्ष घालणार आहेत. त्यानुसार भाजपच्या नेत्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेत ही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने यासंबंधी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी असावी, असा सूर नेत्यांमध्ये आहे. मात्र, त्यासाठी बँकेशी संबंधित मोठे नेते आपल्याकडे वळविण्याचे, आपसांतील वाद मिटविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी नगरला एका खासगी रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी येत आहे. या दिवशी अकोले तालुक्यातही त्यांच्या उपस्थित एक कार्यक्रम असून त्यांचा जिल्ह्यात मुक्काम होण्याची शक्यता आहे. यावेळी बँकेच्या निवडणुकीची अंतिम व्यूहरचना केली जाण्याची शक्यता आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here