मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील कथित व्हॉट्सअॅप चॅटप्रकरणामुळं देशात राजकारण तापलं आहे. काँग्रेसनं अर्णब यांच्या अटकेसाठी आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. दरम्यान, यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थो दासगुप्ता हे टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आहे. दासगुप्ता व अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअप संभाषणाचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहेत. हाच धागा पकडत संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

देशात आम्ही सत्तेत असतो आणि विरोधी पक्षात तर राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी आतापर्यंत तांडव केलं असतं. प्रधानमंत्री कार्यालयावर मोर्चे काढले असते. आज भाजप का गप्प आहे ? राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का ? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं राऊतांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, अर्णब गोस्वामी आहेत कुठे?, असा प्रश्न विचारला असता त्यांनी अर्णब गोस्वामी कुठे आहेत हे कदाचित भाजपला माहिती असेल, कारण सध्या देश त्यांच्या हातात आहे, असा टोलाही लगावला आहे.

धनंजय मुंडे प्रकरणात भाजप नेत्यांना सल्ला
धनंजय मुंडे प्रकरणात मी पहिलेपासून सांगत होतं सत्य समोर येऊदेत. राजकारण आणि समाजकारणात उभं राहण्यासाठी अनेक वर्षे लागतात. ते एखाद्या तक्रारीवरुन उध्द्वस्त करणं योग्य नाही. त्यांच्यावर जे गलिच्छ आरोप झाले त्यात काही तथ्य नाही हे आता हळू हळू स्पष्ट होतंय, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पण जे राजीनामा मागत होते त्यांना माझं एक सांगणं आहे. किमान अशा प्रकरणात माणूसकी ठेवली पाहिजे, आरोप करणाऱ्यांची सत्यता तपासून आरोप केले पाहिजेत, असा सल्ला राऊतांनी भाजपला दिला आहे. तर, धनंजय मुंडे यांच्यावरील जो डाग दूर झाला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीनं सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण, कोणत्याही मंत्र्यांवर अशाप्रकारचे आरोप होणं योग्य नाही. पण आता ती जळमटं दूर झाली, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here