राजस्थानकडून गेल्यावर्षी रॉबिन उथप्पा खेळला होता. पण या वर्षी राजस्थानच्या संघाने उथप्पाला संघात कायम ठेवले नाही. पण त्यानंतर तब्बल तीन कोटी रुपये मोजत चेन्नईच्या संघाने उथप्पााला आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता उथप्पा चेन्नईकडून खेळताना कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
गेल्यावर्षी कोलकाता नाइट रायडर्स या संघाने उथप्पाला रिलिज केले होते. त्यावेळी त्याची बेस प्राइज ही १.५ कोटी रुपये एवढी होती. त्यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान या दोन्ही खेळाडूंनी उथप्पासाठी चांगलीच बोली लावली होती. पण त्यानंतर राजस्थानने तीन कोटी रुपये मोजत उथप्पाला आपल्या संघात स्थान दिले होते. गेल्यावर्षी उथप्पाला मात्र राजस्थानकडून खेळताना चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळेच फक्त एकाच वर्षानंतर राजस्थानने उथप्पाला सोडचिठ्ठी दिली आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स या संघाने हरभजन सिंग, पीयुष चावला, मुरली विजय, केदार जाधव, मोनू सिंग या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर चेन्नईच्या संघाने सुरेश रैनाला संघात कायम ठेवले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही राजस्थान रॉयल्सच्या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावामध्ये बरेच नामांकित खेळाडू पाहायला मिळतील. पण या नामांकित खेळाडूंना नेमक्या कोणत्या संघात स्थान मिळते, याची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना नक्कीच असेल.
आयपीएलचा लिलाव नेमका कधी होणार, याबाबतची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे आता समोर आले आहे. यावर्षी कोणत्या संघात कोणते खेळाडू असतील हे सर्वांना १८ फेब्रुवारीला समजू शकते. कारण बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला खास माहिती दिली आहे. यामध्ये या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” यावर्षी आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होऊ शकतो. पण याबाबतचे ठिकाण मात्र येत्या काही दिवसांमध्ये निश्चित करण्यात येणार आहे.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times