म. टा. वृत्तसेवा,

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम अखेर २६ महिन्यानंतर पूर्ण झाले असून सोमवारी, २५ जानेवारीला सकाळी १२.३० वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नियोजनानुसार शुक्रवारी ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा अहवाल अधिकाऱ्यांना देताच अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. यामुळे अखेर वाहतूककोंडीतून सुटका होण्याचा मुहूर्त निश्चित झाल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

वाचा:

ब्रिटिशकालीन पत्रीपुलावर १८ नोव्हेबर २०१८ला रेल्वेकडून हातोडा मारण्यात आला. तेव्हापासून नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्ते विकास महामंडळाकडून ३६ कोटी रुपयांच्या निधीतून नवा ११० मीटर लांबीचा पत्रीपूल तयार करण्यात आला असून कमीत कमी वेळेत हा पूल पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांतून ठेकेदारावर दबाव येत असल्याने दिवसरात्र काम करून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, सुरुवातीला रेल्वेकडून पुलाची लांबी निश्चित करण्यासाठी करण्यात आलेली दिरंगाई, करोना लॉकडाउनमुळे ठप्प असलेली वाहतूकसुविधा यामुळे पहिल्या लॉकडाउनचा तीन महिन्यांचा कालावधी वाया गेला. मे महिन्यापासून पुन्हा एकदा शासनाच्या परवानगीने पुलाचे काम सुरू करण्यात आले.

वाचा:

नोव्हेंबर महिन्यात पुलाचा ७६ मीटर लांबीचा रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा एकसंध गर्डर बसविण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाने वेग घेतला होता. मात्र तेव्हाच अधिकाऱ्यांनी उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर ठेकेदाराने ठरवून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करत २२ जानेवारी रोजी पूल रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला असून वाहनचालकांना पत्रीपुलावरील वाहतूक कोंडी आणखी दोन दिवस सोसावी लागणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here