म.टा. प्रतिनिधी, नगर: निवडणूक काळात मंदिराकडे जाणारा रस्ता करून देतो, असे आश्वासन जलसंधारण मंत्री यांनी दिले होते. निवडूनआल्यावर शब्दाला जागत त्यांनी त्यासाठी २५ लाखांचा निधीही मंजूर करून दिला. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू होण्यामध्ये बांधाच्या वादाची अडचण होती. अखेर मंत्री गडाख यांचे बंधु यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी यासाठी पुढाकार घेतला. बांधावर जाऊन शेतकऱ्यांमध्ये समेट घडवून आणून कामातील अडथळा दूर करून दिला.

नेवासा तालुक्यातील भालगाव येथील गुप्ताईदेवी मंदिराकडे जाणारा सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता शेताच्या बांधावरील व व्यक्तिगत वाद यामुळे बंद होता. या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने या परिसरातील पादचारी व वाड्यावस्त्यांवर रहाणारे ही चिंतेत होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात गडाखांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार तो मंजुरही करून दिला. त्यानुसार काम सुरू झाले. तेव्हा मात्र नवीनच अडचण पुढे आली.

काम सुरू असताना बांधावर पाईप टाकण्याच्या वादामुळे या रस्त्याचे काम बंद पडले. पुन्हा प्रशांत गडाख यांनी पुढाकार घेतला. रस्त्याची पहाणी केली. वाद असलेल्या काही शेतकऱ्यांना समोरासमोर आणून त्यांची समजूत काढली. गावकऱ्यांचे हित व एकोपा जोपासण्याचे आवाहन केले. त्याचा चांगला परिणाम झाला. वाद मिटला आणि रस्त्याच्या कामाला संमती मिळाली. लगेच कामाला सुरवात झाली.

गडाख यांनी शिष्टाई केल्यामुळे रस्त्यातील वाद कायमचा मिटवून रस्त्याचे काम सुरू झाले. त्यामुळे उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ प्रशांत गडाख यांचा सत्कार करू लागले. मात्र त्याला नकार देत ज्यांच्या सामंजस्याने वाद मिटला तेच खरे या सत्कारास पात्र असल्याचे सांगून गडाख यांनी दोन्हीही बाजूच्या शेतकऱ्यांचा गौरव केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here