म. टा. प्रतिनिधी,

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून २०२० या वर्षामध्ये एकूण १३४३ पुरुष आणि १८५१ महिला झालेल्या असून यापैकी अनुक्रमे ७४८ आणि १०४९ पुरुष, महिला सापडले आहेत. एकूण बेपत्ता व्यक्तींची संख्या ३१९४ असून यावरून दिवसाला सरासरी सुमारे पाच महिला आणि तीन पुरुष बेपत्ता होत असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता होण्यामागची करणे वेगवेगळी असल्याचे सांगितले जात आहे.

एखादी महिला किंवा पुरुष बेपत्ता झाल्यास त्यांचे नातेवाईक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देतात. त्यानंतर पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जातो. रेल्वे स्टेशन, बस स्थानक तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बेपत्ता व्यक्तींचे फोटो चिकटवले जातात. तसेच संपर्क नंबरही दिलेले असतात. जेणेकरून व्यक्ती दिसल्यास लोक फोन करून माहिती देतील. परंतु अनेक प्रकणांमध्ये बेपत्ता व्यक्तीचा वर्षानुवर्षे शोध लागत नाही. नातेवाईकही शोध घेऊन थकतात. तसेच अल्पवयीन मुलगी किंवा मुलगा अचानक बेपत्ता झाल्यास पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. अशा प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसही वेगाने तपास करत मुलांचा शोध घेतात. ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटकडून विशेषकरून हरवलेल्या, बेपत्ता तसेच अपहरण झालेल्या मुलांना शोधून काढण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली जात आहे. आतापर्यंत अनेक मुलांचा शोध घेऊन पालकांशी भेट घडवून आणली गेली. मात्र, चाइल्ड प्रोटेक्शन युनिटची स्थापना झाली तेव्हा या युनिटमध्ये अधिकारी, कर्मचारी वर्गाची संख्या पुरेशी होती. आता मात्र या युनिटमध्ये खूपच कमी संख्येने अधिकारी, कर्मचारी आहेत. अल्पवयीन मुलांचे अपहरणाचे गुन्हे वाढत असताना दुसरीकडे कमी मनुष्यबळात या मुलांचा शोध घेताना या युनिटची तारांबळ उडत असल्याचे दिसत आहे.

पुरुषांपेक्षा महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र असले तरी दिवसाला ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून महिला आणि पुरुष मिळून सरासरी आठ जण बेपत्ता होत असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच सरलेल्या २०२०मध्ये बेपत्ता व्यक्तींची संख्या ३ हजार १९४ (महिला, पुरुष) इतकी होती. यापैकी १ हजार ३४३ पुरुष बेपत्ता झाले असून यापैकी ७४८ पुरुषांचा शोध घेण्यामध्ये पोलिसांना यश आले. तर, वर्षभरात १ हजार ८५१ महिला बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी १ हजार ४९ महिला मिळाल्या असल्याची माहिती ठाणे पोलिसांकडून देण्यात आली. अशा प्रकारे वर्षभरात १७९७ जणांचा शोध लागला आहे. तर, ८०२ महिला आणि ५९५ पुरुष असे एकूण १३९७ जणांचा ठावठिकाणा लागलेला नाही. गेल्या वर्षी दिवसाला सरासरी पाच महिला आणि तीन पुरुष बेपत्ता झाल्याचे दिसत आहे. अनेकदा बेपत्ता मुले, मुली किंवा महिला आणि पुरुष बाहेरील राज्यातही सापडले आहेत.

कोणत्या कारणामुळे किती बेपत्ता

घरात काहीही न सांगता निघून गेलेले – १५०८

प्रेमप्रकरण- १८३

कौटुंबिक वाद- २३

इतर कारणे- १४८०

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here