शर्जीलविरुद्ध दिल्लीसह बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर अशा एकूण सहा राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांची पाच पथके त्याच्या मागावर होती. दिल्लीसह पाटणा व मुंबईतही काही ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. मात्र शर्जील हाती लागला नव्हता. आज त्याला जहानाबादमधील काको येथून अटक करण्यात आली आहे. शर्जीलच्या वकिलांनी मात्र शर्जील स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाला व त्याला नंतर अटक करण्यात आली, असा दावा केला आहे.
विद्यापीठाकडूनही समन्स
शाहीन बागेत आयोजित करण्यात करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जील होता. तेथे त्याने दोन धर्मांत तेढ वाढवणारे प्रक्षोभक भाषण केले, असा आरोप ठेवून त्याच्यावर विविध कलमांखाली रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये १६ जानेवारी रोजी केलेल्या भाषणावरूनही शर्जील गोत्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध या भाषणामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसाम पोलिसांनीही त्याच्याविरुद्ध दहशतवाद विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शर्जील हा जेएनयूत पीएचडी करत असून विद्यापीठ प्रशासनानेही त्याच्याविरुद्ध कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जेएनयूच्या शिस्तपालन अधिकाऱ्यांमार्फत शरजीलला समन्स बजावण्यात आले आहे. शिस्तपालन समितीपुढे ३ फेब्रुवारीच्या आत हजर राहावे व प्रक्षोभक भाषणांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
शर्जीलच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल
शर्जीलचा हिंसेला चिथावणी देणाऱ्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ‘दिल्लीचे जनजीवन विस्कळीत व्हावे ही आमची इच्छा आहे. दिल्लीच नव्हे तर जगातील प्रत्येक शहरात चक्काजाम झालाच पाहिजे. देशातील अनेक शहरांत मुस्लिम लोक चक्काजाम करू शकतात. मुस्लिमांकडे तेवढी ताकद नाही का? उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ३० टक्के आहे. तुमची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे तर या शहरांचे जनजीवन सुरळीत कसे सुरू आहे? तुम्ही शहरात राहणारे आहात, तर शहरे बंद करा’, अशी चिथावणी शर्जील देत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times