म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या मुंबई महापालिकेसमोर येत्या काळात विकासकामांसाठी पैसे उभे करण्याचे आव्हान आहे. उत्पन्नाचे स्रोत आटले असून अंतर्गत निधीतून फार मोठी रक्कम उचलता येत नाही. त्यामुळे पालिकेने आता शेअर बाजारातून कर्ज रोख्यातून () पैसे उभारण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात प्रशासनातर्फे गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव मांडून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरात पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. करोनावरील उपाययोजनांसाठी आतापर्यंत १६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर दुसरीकडे उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. हजारो कोटींच्या मालमत्ता कराची वसुली रखडली आहे. यासह विविध प्रकारच्या करांमधून मिळणारे उत्पन्न यंदा कमी झाले आहे. सर्व प्रकारचे उत्पन्न मिळून सन २०२०-२१मध्ये पालिकेचे सुमारे दहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

पालिकेला रस्ते, पाणी, पूल, घनकचरा, मलनि:सारण यासह विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी दरवर्षी दहा ते १२ हजार कोटी रुपये लागतात. राज्य सरकारकडून येणारे जीएसटीचे वार्षिक सात ते आठ हजार कोटी रुपयांचे ठोस उत्पन्न वगळता अन्य उत्पन्नांचा पर्याय सध्या पालिकेकडे नाही. बँकांमधील दीर्घ मुदतठेवी सुमारे एक लाख कोटींच्या घरात पोहोचल्या आहेत. मात्र त्यातील हजारो कोटी रुपये विविध विकास प्रकल्प, कर्मचाऱ्यांचे पेन्शन व इतर कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुदतठेवींना फार हात लावता येत नाही.

या विविध कारणांमुळे पालिकेपुढचे आर्थिक संकट गडद होत चालले असून करोना स्थिती निवळल्यानंतरही उत्पन्न वाढीस आणखी किती काळ लागेल, हे अनिश्चित आहे. त्यामुळे विकासकामांसाठी लागणारे हजारो कोटी रुपये शेअर बाजारातून उभे करण्याचा विचार पालिका करत आहे. या वृत्ताला मुंबईच्या महापौर यांनी दुजोरा दिला आहे.

याआधी प्रस्ताव बारगळला

पुणे, अहमदाबाद व अन्य काही महापालिकांनी विकासकामांसाठी उभारले आहेत. या धर्तीवर मुंबई महापालिकेने ‘म्युनिसिपल बाँड’ उभारावा, असा विचार सन २०१४ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी प्रशासनासमोर मांडला होता. त्यावर प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र त्यावेळेस पालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने हा प्रस्ताव बारगळला.

शेअर बाजारातून कर्जरोखे उभारण्याबाबत दोन दिवसांपूर्वी पालिकेत एक बैठक झाली. येत्या आठवड्यात गटनेत्यांच्या बैठकीत प्रशासनाकडून याबाबत प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

– किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here